कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला जागतिक पर्यटन क्षेत्रांच्या यादीत आणण्यासाठी पर्यटन आराखडा तयार करण्यात येत आहे. याअंतर्गत जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत पर्यटन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनामुळे हे उपक्रम मर्यादित स्वरुपात होतील; मात्र ते समाजमाध्यमांद्वारे जगभरातील नागरिकांपर्यंत पोहोचवले जातील, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर गड, किल्ले, ऐतिहासिक-धार्मिक, वारसा स्थळे, संग्रहालये, पुरातत्त्व ठिकाणे, जंगले, वनराई, जैवविविधता, कला, क्रीडा, सांस्कृतिक, उत्सव, शैक्षणिक, जल पर्यटन, ग्रामीण, कृषी, साहसी, औद्योगिक पर्यटन, हस्तकला, खाद्यसंस्कृतीने परिपूर्ण आहे. जिल्ह्यातील पर्यटन वाढावे, पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने उपलब्ध खजिना सर्वांसमोर यावा, या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने पुढील आठवड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. २६ सप्टेंबरला करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली होती, या दिवसापासून या उपक्रमांना सुरुवात होईल.
या उपक्रमात जिल्हा प्रशासनासोबत क्रेडाई, हॉटेल मालक संघ, हेरिटेज कमिटी, पर्यटन महामंडळ, पुरातत्त्व विभाग, ट्रॅव्हल एजन्ट असोसिएशन, देवस्थान समिती, हिल रायडर्स ॲडव्हेंचर फौंडेशन, कोल्हापूर जिल्हा माऊंटनिअरिंग व अलाईड स्पोर्ट्स असोसिएशन, टूर ऑपरेटर्स, निर्मिती ग्राफिक्स तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग असेल.
-------------
आठवड्यातील उपक्रम असे..
- मान्यवर चित्रकार व शिल्पकारांची प्रात्यक्षिके
- करवीर निवासिनी पुनर्प्राणप्रतिष्ठापना दिन वर्धापन सोहळा
- डेस्टिनेशन कोल्हापूर लोगो, जिल्हा पर्यटन वेबसाईट व नकाशाचे अनावरण,
- निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, व्हिडिओग्राफ स्पर्धा. उत्सवांचे वेळापत्रक प्रकाशन,
- ऑनलाईन व्याख्याने, बाईक रॅली, दुर्ग भ्रमंती, जंगल भ्रमंती, ग्राम भ्रमंती, जल पर्यटन, कृषी पर्यटन, हस्तकला प्रात्यक्षिक, ऑफ रोड रॅली, हेरिटेज वॉक
---
विमानतळावर मिळणार माहिती
कोल्हापूर विमानतळावर रोज शेकडो पर्यटक येतात. येथे त्यांना कोल्हापुरातील पर्यटनाची माहिती डिजिटल बोर्ड, माहितीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरदेखील कोल्हापूरचे बोर्ड लावण्यात येणार आहे. येथून जाणारा नागरिक २-३ तासांसाठी कोल्हापुरात यावा, अशी अपेक्षा आहे. राधानगरी जंगल सफारीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एक बस देण्यात आली असून, तिचे नोव्हेंबरपर्यंत बुकिंग झाली आहे. या सफारीसाठी आणखी दोन बसेस घेण्यात येणार आहे.
--