कोल्हापूर : गेले दहा दिवस सुरू असलेल्या गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर आता शारदीय नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. यानिमित्त साडेतीन शक्तिपीठातील प्रमुख देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराच्या शिखरांच्या स्वच्छतेला आणि रंगरंगोटीला आज, बुधवारपासून सुरुवात झाली.सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती अनंत चतुर्दशीला विसर्जित झाल्यानंतर पितृपक्ष सुरू होतो. या कालावधीत निधन झालेल्या व्यक्तींच्या नावे महाळ किंवा श्राद्ध केले जाते. सर्व पित्री अमावास्या झाली की अश्विम महिन्याच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. यंदा २५ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. नवरात्राला केवळ १३ दिवस राहिल्याने आता करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातही उत्सवाची तयारी सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी मंदिराच्या पाचही शिखरांच्या स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे. शिखरांना अनिल अदिक यांच्यावतीने मोफत रंगरंगोटी केली जाते. मंडप उभारणी व विद्युत रोषणाईचे काम ए-वन डेकोरेटर्स यांना देण्यात आले आहे. वारंवार निविदा प्रक्रिया करण्याऐवजी वर्षभरातील सर्व लहानमोठ्या उत्सवांना लागणाऱ्या मंडप व विद्युत व्यवस्थेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या पाच-सहा दिवसांत मंडप उभारणीलाही सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)रॅम्पची सोयमंदिरात जाण्यासाठी पायऱ्यांचा वापर करावा लागत असल्याने वृद्ध व्यक्तींना पायऱ्या चढताना त्रास होतो. शिवाय अपंगांना किंवा व्हीलचेअरवर असलेल्या व्यक्तींना आत जाता येत नाही. ही अडचण ओळखून समितीने शनि मंदिराजवळील गेटवर रॅम्प करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हीआयपी गेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दरवाजावरील रॅम्पमुळे वृद्ध व अपंगांना विनासायास महालक्ष्मीचे दर्शन घेता येईल. दहा कॅमेरे वाढविले..महालक्ष्मी मंदिराच्या आवारात सध्या ३२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. आता यात दहा कॅमेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. मंदिराच्या बाह्य परिसरात लावण्यात येणाऱ्या या कॅमेऱ्यांमुळे आता या ठिकाणीही सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे.
कोल्हापूर- वेध नवरात्रोत्सवाचे
By admin | Updated: September 10, 2014 23:54 IST