कोल्हापूर : ग्रामपंचायतीचे कामकाज आॅनलाईन व पारदर्शी करण्यासाठी केंद्र शासनाने २०११ पासून संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) अंतर्गत ई-पंचायत प्रणाली कार्यान्वित केली. जिल्ह्णातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘संग्राम कक्ष’ स्थापन केले. या कक्षातून आतापर्यंत पाच लाख ५९ हजार ६९१ विविध प्रकारचे आॅनलाईन दाखले दिले आहेत. प्रत्येक दिवशी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सरासरी तीन हजार ४०८ आॅनलाईन दाखले दिले जात आहेत. या कामकाजात राज्यात सध्या कोल्हापूर जिल्हा ‘नंबर वन’ आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील यांनी आज, मंगळवारी समिती सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. सुभेदार म्हणाले, संग्राम केंद्रात ग्रामस्तरावरील दैनंदिन खर्च, ग्रामपंचायत मालकीची मालमत्तेची माहिती अपडेट केली जाते. याशिवाय आॅनलाईन विविध दाखले देश, परदेशातून कोठूनही मिळण्याची व्यवस्था केली आहे. या प्रणालीमुळे ग्रामपंचायत पातळीवर पारदर्शकता आली असून, सर्व माहिती संगणक चालकांकडून भरून ग्रामसेवकाकडून प्रमाणित केली जाते. दररोज प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कामकाजावर बारीक लक्ष ठेवले. जिल्ह्णातील १५ ते २० ग्रामपंचायतींना भेट देऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. संग्राम सॉफ्टवेअर व ‘एनआयसी’मध्ये आतापर्यंत एकूण ४८ लाख ९६ हजार २५५ इतक्या नोंदी झाल्या आहेत. यापैकी ‘एनआयसी’मध्ये एकूण १३ लाख ८७ हजार ८१८ नोंदी, तर संग्राम स्वॉफ्टवेअरमध्ये ३५ लाख ८७ हजार ५३७ नोंदी केल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावर चालणारे सर्व कामकाज आॅनलाईन पाहता येते. वेगवेगळ्या योजनांवर केलेला खर्च, गावात मिळणाऱ्या सुविधा याची ग्रामस्तरावरच माहिती मिळत आहे. गावातील कर मागणीची बिलेही आॅनलाईन देणे शक्य झाले आहे. जिल्ह्णातील ५०३ ग्रामपंचायतींची वित्तीय समावेशनासाठी निवड केली आहे. यापैकी ९५ केंद्रांवर ग्रामस्थांची बँक खाती उघडली जात आहेत. आतापर्यंत या केंद्रावर ६ हजार १३४ खाती उघडली असून, ३१२ व्यवहार झाले आहेत. ते म्हणाले, एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्णात १६ प्रकल्पांतर्गत तीन हजार ९९४ अंगणवाड्या कार्यरत आहेत. जुलै महिन्याच्या अहवालानुसार जिल्ह्णात कमी वजनाची नऊ हजार ८४, तर तीव्र कमी वजनाची १३४२ बालके आहेत. या सर्व बालकांचे वजन वाढावे, यासाठी सदृढ निरोगी बालक, सदृढ समाज अभियान राबवले. (प्रतिनिधी)गडहिंग्लज, आजरा सदस्यांचे योगदान...सदृढ बालक व्हावेत, यासाठी गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य यांनी एक महिन्याचे मानधन दिले आहे. पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार आरोग्य व पोषण केंद्रासाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे दिला आहे. आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांनी आरोग्य, पोषण केंद्रास आवश्यक असलेली सर्व औषधे देऊन योगदान दिले आहे, असेही सुभेदार यांनी सांगितले.
‘संग्राम’मध्ये कोल्हापूर नंबर वन
By admin | Updated: November 12, 2014 00:40 IST