कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. सायंकाळी मात्र पावसाने दमदार हजेरी लावली. धरणक्षेत्रात सरासरी ९२ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणीपातळीत वाढ झाली असून, पंचगंगा नदीची पातळी १२ फुटांपर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यात सरासरी २८.६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेले दोन-तीन दिवस जिल्ह्यात पावसाचा असणारा जोर शुक्रवारी सकाळपासून काहीसा कमी झाला होता. शहरात दिवसभर पावसाने एकदम विश्रांती घेतली होती. सायंकाळी पाचनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. तब्बल तासभर पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याने शहरात पाणीच पाणी झाले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप राहिली. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ३४३.४४ मिलिमीटर पाऊस झाला असून, सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ६२ मिलिमीटर झाला आहे. शाहूवाडी ५८, पन्हाळा ३७, राधानगरी ३०.६७, भुदरगड ३३.४०, आजरा ३६.२५ मिलिमीटर पाऊस झाला. धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली असून सर्वाधिक पाऊस कडवी परिसरात १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली असून, पंचगंगा नदीची पातळी १२ फुटांपर्यंत पोहोचली आहे. राजाराम बंधाऱ्यातून प्रतिसेकंद ३२६६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असून कुंभी, भोगावती नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.राजाराम बंधाऱ्याजवळ पाणीपातळीत वाढकसबा बावडा : पावसाची दोन-तीन दिवसांपासून संततधार कायम असल्यामुळे ‘राजाराम’ बंधाऱ्याजवळ पाणीपातळीत वाढ होऊन ती आता १६ फुटांवर गेली आहे. १८ फुटाला बंधारा पाण्याखाली जातो. सध्या बंधाऱ्याजवळ नदीचे पाणी घाटाच्या पायरीजवळ आले आहे. पाण्याच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. पाऊस सलग आणखी एक-दोन दिवस झाल्यास बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. बंधाऱ्याजवळ पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीपात्रातील महादेवाचे मंदिर पाण्यात बुडाले आहे. मंदिराचा कळस तेवढा दिसत आहे.
कोल्हापुरात दिवसभर उघडीप सायंकाळी जोरदार पाऊस
By admin | Updated: July 2, 2016 00:43 IST