लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीने २०२०-२१ या आर्थिक वर्षात ताळेबंदाला तरतुदी कमी दाखवून नफा फुगविला असून संस्थेला अधोगतीकडे नेल्याचा आरोप संस्थेचे माजी अध्यक्ष आर. बी. पाटील, सर्जेराव जरग, एन. के. पाटील, बी. बी. मिसाळ, आदींनी पत्रकातून केला.
गुंतवणुकीवरील व्याज हे येणे धरून नफा वाढविला आहे. गेल्या आर्थिक वर्षापेक्षा पंधरा लाखांनी कर्जपुरवठा कमी असताना नफा मात्र दहा लाखांनी वाढला आहे. ठेवीवर ८.५ टक्के व्याजदर दाखविला आहे, त्यातून २ कोटी व्याज देणे अपेक्षित होते; मात्र ताळेबंदाला ५४ लाख ६० हजार रुपये व्याजावरील खर्च दाखविला आहे. ठेवीदारांकडून साडेआठ टक्के व्याजाने घेऊन सभासदांना ११.५० टक्क्यांनी रकमेचे वाटप केले जाते. इतर संस्था १० टक्क्यांनी कर्जपुरवठा करीत असल्याने दर कमी करण्याची मागणी सभासद करीत असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. सेवानिवृत्त सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा सपाटा लावला आहे, त्यातील काहीजण जामीनदार आहेत. मग थकीत कर्जाच्या वसुलीला जबाबदार कोण राहणार, असे अनेक प्रश्न सत्तारूढ मंडळीनी निर्माण केले आहेत. त्याचबरोबर इतर ठिकाणी गुंतवणुकीवरील व्याजाचा जमाखर्च ज्या-त्या वर्षी होत नसल्याचेही संस्थेचे माजी अध्यक्ष सर्जेराव जरग यांनी म्हटले आहे.
४० सभासदांसाठी दोन शाखा
बांबवडे (ता. शाहूवाडी) व कोतोली (ता. पन्हाळा) या परिसरांत पतपेढीचे साधारणत: ४० ते ५० सभासद आहेत. त्यांच्यासाठी दोन शाखांचा प्रस्ताव सहकार विभागाकडे पाठविला आहे. मुळात शाखांचा खर्च मुख्य कार्यालयावर टाकून तोट्यातील शाखा नफ्यात दाखविण्याची किमया सत्तारूढ गटाने केल्याचा आराेप पाटील यांनी केला.