कोडोली : घरासमोरील पेटविलेला कचरा विझविल्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या तलवार हल्ल्यात तानाजी महादेव किबिले (वय ५२ , रा. किबिले मळा, कोडोली) हा जखमी झाला. यामध्ये दोन्ही गटांनी परस्पर विरोधात फिर्याद दिल्याने दोन्ही गटांच्या दहाजणांना कोडोली पोलिसांनी अटक केली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तानाजी महादेव किबिले यांच्या घराजवळ टाकलेला कचरा कोणीतरी पेटविला होता. त्याच्या धुरामुळे त्रास होऊ लागला म्हणून तानाजी किबिले यांनी सदर पेटविलेला कचरा विझविला. कचरा विझविल्याच्या कारणावरून विलास पांडुरंग किबिले व तानाजी किबिले यांच्यात वाद झाला. याबाबतची माहिती दोन्ही गटांतील लोकांना समजताच लोक एकत्र येताच वाद वाढत गेला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी विलास किबिले यांनी तानाजी किबिले यांच्या हातावर तलवारीने वार करून त्यांना जखमी केले. याबाबत तानाजी किबिले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलास किबिले, सतीश किबिले, सत्यजित किबिले, संदीप किबिले, गजानन किबिले यांना पोलिसांनी अटक केली. तर संतोष किबिले, आनंदराव किबिले, शिवाजी किबिले व सुशिला किबिले या चौघांवर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर विरोधी गटाच्या सुशिला विलास किबिले यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून तानाजी किबिले, मनोहर किबिले, अजित किबिले, अमर किबिले, संजित किबिले यांना पोलिसांनी अटक केली असून, नंदिनी किबिले, सुशिला तानाजी किबिले व रूपाली खाडे यांच्यावर गुन्हा नोद करण्यात आला आहे. अटक केलेल्या सर्वही दहाजणांना पन्हाळा न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
कोडोलीत दोन गटात किरकोळ कारणावरून जोरदार हाणामारी
By admin | Updated: April 12, 2015 00:51 IST