जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथे कोल्हापूर-सांगली बायपास रोडवर टाटा टेम्पो व मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कोडोली (ता. पन्हाळा) येथील जयदीप जयसिंग पाटील (वय २०) हा युवक जागीच ठार झाला. शनिवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जयदीप दुपारी मोटारसायकल (एम एच ०९ डीडी ९११९)वरून कोडोलीकडे जात होता, तर टेम्पो (एम एच ०९ सीए २९४) कोल्हापूरहून मिरजेकडे जात होता. उदगाव येथील सतीश कुकडे यांच्या शेताजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात जयदीपच्या डोक्यास व उजव्या पायास गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. अपघाताची वर्दी टेम्पोचालक अकबर हुसेनसाब जमादार (रा. उजळाईवाडी) याने पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनानंतर नातेवाइकांच्या ताब्यात दिला. जयदीपच्या कुटुंबीयांनी नेत्रदानाचा निर्णय घेऊन सांगली येथील दृष्टीदान नेत्रपेढीस नेत्रदान केले. जयदीप सांगली येथे भारती विद्यापीठाच्या दंत महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत होता. तसेच तो हॉस्टेलमध्ये राहत होता. महाविद्यालयास दोन दिवस सुटी असल्याने तो घरी जात असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. अपघाताची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झाली आहे. (प्रतिनिधी)
उदगावजवळ अपघातात कोडोलीचा तरूण ठार
By admin | Updated: December 6, 2015 01:39 IST