कोल्हापूर : के.एम.टी. विभाग हा महानगरपालिकेचाच एक भाग असल्याने तेथील कर्मचाऱ्यांना महापालिका आस्थापनावर घेण्यात यावे, अशी मागणी के.एम.टी.च्या काही कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सहायक आयुक्त चेतन कोंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, के.एम.टी.कडे चालक, वाहक वर्कशॉप, कार्यालय आदी विभागांत एकूण ४८० च्या आसपास कायम कर्मचारी आहेत तसेच के.एम.टी. ही महापालिकेचाच एक भाग आहे. सध्या के.एम.टी. आर्थिक खोलात जात असून कितीही प्रयत्न करून ही स्वबळावर येऊ शकत नाही. त्यामुळे के.एम.टी. कायम कर्मचाऱ्यांना महापालिका आस्थापनावर समाविष्ट करून घेऊन उरलेले रोजंदारी लोकांच्या सोबत के.एम.टी. विभाग हा चालू शकतो व के.एम.टी. ही परत पूर्व पदावर येऊ शकते. निवेदन देतेवेळी प्रमोद पाटील, मनोज नार्वेकर, मानसिंग जाधव, सुरेश मुधोळकर, रणजित पाटील उपस्थित होते.