भुर्इंज : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याकडे उसाची पारदर्शकपणे लागण नोंद होऊन वेळेत गळित आणि ऊस तोडणीचे नियोजन होण्यासाठी व्यवस्थापनाने सुरू केलेल्या हंगाम व जातनिहाय ऊसलागवड योजनेअंतर्गत अँड्रॉइड मोबाईलद्वारे ऊस क्षेत्र नोंदणीचा प्रारंभ झाला.भुर्इंज येथील प्रगतशील शेतकरी अशोक गणपत चव्हाण, व्हीएसआयच्या अल्कोटेक विभागाचे प्रमुख डॉ. एस. व्ही. पाटील, सपोर्ट टेक्नॉलॉजीजचे राजेंद्र वीर, एस. आर. इन्फोटेकचे एन. एस. पाटील व प्रा. डॉ. आर. डी. कुंभार यांच्या हस्ते, कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, संचालक मंडळ व सभासद शेतकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. दरम्यान, राज्यातील सहकारी साखर उद्योगात माहिती तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर करून ऊस नोंदीची आधुनिक प्रणाली वापरणारा किसन वीर हा पहिला साखर कारखाना असल्याचे यावेळी आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. कुंभार यांनी सांगितले.किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याकडे ऊस नोंद केलेला आहे. त्या उसाचे विहित वेळेत गळित आणि ऊस तोडणीचे नियोजन होण्याच्या दृष्टीने व्यवस्थापनाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या लागण हंगामापासून हंगाम व जातनिहाय ऊस लागवडीचे नियोजन केलेले आहे. यंदाच्या लागण हंगामापासून उसाच्या नोंदी अँड्रॉइड मोबाईलद्वारे प्रत्यक्ष ऊसलागवड क्षेत्रात जाऊन शेती खात्यामार्फत घेण्यात येणार आहेत. त्याचा प्रारंभ भुर्इंज येथे करण्यात आला.संचालक चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, नवनाथ केंजळे, राहुल घाडगे, प्रताप यादव, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ आदी उपस्थित होते. नंदकुमार निकम यांनी प्रास्ताविक, भुर्इंजचे सरपंच बाळासाहेब कांबळे यांनी आभार मानले. (वार्ताहर) अशी होणार उसाची नोंद... शेती खात्यातील कर्मचारी अँड्रॉइड मोबाईलद्वारे दिलेल्या प्रणालीमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्याचा कोड, मोबाईल नंबर, गाव-शिवार, ऊस लागण हंगाम, उसाची जात, लागण तारीख, सर्व्हे नंबर आदी माहिती भरून संबंधित शेतकऱ्याचा ऊस क्षेत्रासह फोटो या प्रणालीमध्ये घेण्यात येईल. माहिती कारखाना सर्व्हरला मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या उसाची नोंद होणार आहे.
‘किसन वीर’ची मोबाइलद्वारे ऊस नोंद
By admin | Updated: July 20, 2015 00:04 IST