दत्ता पाटील
म्हाकवे : मेतके (ता. कागल) येथे समरजित घाटगे गटाचे अस्तित्वच नव्हते. गेल्या दोन वर्षांत या गटाने मूळ धरले असले तरी अस्तित्व सिद्ध करण्यासाठी या गटाला झुंजावे लागणार आहे. त्यांच्यासमोर महायुतीच्या माध्यमातून अनुभवी नेतेमंडळींचे कडवे आव्हान आहे.
मूळक्षेत्र मेतके हे सद्गुरू बाळूमामा यांच्या वास्तव्याने पुनित झालेले गाव. येथील निवडणुकाही मैत्रीपूर्णच होतात. गत निवडणुकीत मंडलिक-संजय घाटगे गटाची युती होती, तर त्यांच्या विरोधात मुश्रीफ गटाने एकाकी झुंज दिली होती. यामध्ये युतीची सत्ता प्रस्थापित झाली.
या निवडणुकीत मंडलिक, संजय घाटगे व मुश्रीफ गट एकत्रित आले आहेत, तर येथे राजे गटाचे अस्तित्वच नव्हते. गेल्या दोन वर्षांत समरजित घाटगे यांनी येथे लक्ष घालून गटाची उभारणी केली. परंतु, पहिल्याच निवडणुकीत महायुतीच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. युतीचे बाबासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, विकास पाटील, दशरथ कामते, रणजित पाटील, बापूसाहेब पाटील, काशिनाथ पाटील, राजेंद्र पाटील, सखाराम कुंभार यांनी मोट बांधली आहे. राजे गटाच्या अस्तित्वासाठी अभय कामते, शंकर पाटील, वसंत भारमल हे प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत.
सासू-सून आणि जावांमध्येही धुमशान...
ग्रामपंचायतीची निवडणूक ही भावकी, नातेवाइकांमध्येच घुटमळत असते. याचे प्रत्यंतर येथे आले आहे. विजय मारुती जाधव हे राजे गटाकडून उमेदवार आहेत, तर याच कुंटुबातील आनंदी जाधव या आघाडीच्या उमेदवार असून त्यांच्या विरोधात त्यांच्या सूनबाई पूजा जाधव यांनी कंबर कसली आहे. तर राजे गटाकडून सुनीता कामते यांच्या विरोधात आघाडीकडून सरिता कामते या जावा-जावा नशीब आजमावत आहेत.
.............
सदस्य संख्या- ७
प्रभाग - ३
मतदार संख्या- ९२५