शहापूर : किरकोळ कारणावरून खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील उपसरपंच व विद्यमान ग्रा. पं. सदस्या यांच्या पतीच्या डोक्यात एकाने कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला. राहुल मनोहर बुरसे (वय ३८, रा. ग्रामपंचायतीमागे) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी चौघांना शहापूर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अंबादार असाली, नागेश हिरेकुरबुर, सुमित जाधव व सौरभ पाटील अशी कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, अंबादार व राहुल बुरसे हे शेजारी राहण्यास आहेत. अंबादार याच्याकडे नेहमीच बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची वर्दळ असते. राहुल यांनी अंबादार याला तोंडाला मास्क लावत जा व इतरत्र थुंकू नकोस, असे सांगितले. त्यावर अंबादार याने राहुल यांना तू आम्हाला शहाणपण सांगायचे नाहीस?, तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देत वरील तिघांना बोलावून घेतले व पुन्हा वादाला सुरुवात झाली.
त्यादरम्यान अंबादार याने राहुल यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून मोटारसायकल तेथेच सोडून साथीदारांनीही पलायन केले. नागरिकांनी जखमी राहुल यांना तत्काळ आयजीएम रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत ग्रामपंचायत सदस्य व नेतेमंडळी संशयिताला अटक करून कारवाई व्हावी, यासाठी पोलीस ठाण्यात ठाण मांडले. या हल्ल्याप्रकरणी खोतवाडीत भीतीचे वातावरण पसरले आहे. राहुल यांच्यावर हल्ला करून पलायन केलेल्या चौघांकडे शस्त्रे मिळून आल्याची चर्चा सुरू होती.