: कवठेसार (ता. शिरोळ) येथे सानुग्रह अनुदानासाठी पंचनामे सुरू असताना ग्रामस्थांनी असे पंचनामे आम्हाला मान्य नाहीत, असे म्हणत ते बंद पडले. संपूर्ण गावाला नदीचा विळखा असताना १०० टक्के गाव पूर बाधित धरून पंचनामा करावा, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.
एका रात्रीत झपाट्याने नदीचे पाणी वाढत रस्ते बंद होऊन पूर गावापर्यंत आला. यावर्षी २०१९ पेक्षा मोठा महापूर येईल, त्यामुळे संपूर्ण गाव स्थलांतरित करण्याचा आदेश प्रशासनाने दिला होता. २०१९ चा महापूर लक्षात घेता दानोळी मार्ग तर आधीच बंद होतो व हिंगणगाव मार्गावरील ओढ्यात पुराचे पाणी येते, त्यामुळे गावातून बाहेर पडण्यासाठी कोणताच मार्ग शिल्लक राहात नाही, म्हणून ग्रामस्थांनी आपली जनावरे, आवश्यक साहित्यासह स्थलांतर केले होते, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पण सध्या पंचनामा करताना ज्यांच्या घरात पाणी त्यांनाच अनुदान, असे हेवेदावे का करत आहेत, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. क्षणार्धात भरपावसात हृदयावर दगड ठेवून ग्रामस्थांना आहे त्या अवस्थेत आपले घर सोडावे लागले, याची जाणीव प्रशासनाने ठेवावी, तसेच स्थलांतर होणे ही आर्थिकदृष्ट्या परवडणारी गोष्ट नाही, त्यामुळे संपूर्ण गाव पूरबाधित धरून पंचनामा करण्यात यावा, अशी प्रशासनाला विनंती केली आहे.