कोल्हापूर : येथील गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिने माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे ध्येय बाळगले आहे. त्यासाठी बेसकॅॅम्प दि. १८ एप्रिलपासून सुरू झाला आहे. या अंतर्गत तिने सोमवारी साडेचार तासांमध्ये कालापत्थर हे शिखर सर केले. त्यासाठी तिच्या समवेत बारा जण होते. नऊ तास चालल्यानंतर ते ‘कालापत्थर’वर पोहोचले.
गेल्या काही दिवसांपासून कस्तुरी आणि तिच्या समवेतच्या अन्य सहकाऱ्यांचा तांत्रिक सराव सुरू होता. त्यामुळे त्यांचे सोमवारी ॲकलमटाइज वॉक होते. त्यांनी हे वॉक पुमोरी पिकच्या दक्षिणेला असणाऱ्या १८५१९ फूट उंचीच्या कालापत्थर या शिखरावर केले. या शिखरापासून माऊंट एव्हरेस्ट एकदम जवळ दिसतो. ‘कालापत्थर’ सर करण्यासाठी त्यांनी सकाळी साडेआठ वाजल्यापासून चालण्यास सुरुवात केली. संपूर्ण चढच चढ होता. रात्री बर्फवृष्टी झाल्याचे जाणवत होते. साडेचार तासांत ते कालापत्थरवर पोहोचले. तेथून पुन्हा बेसकॅॅम्पवर आले. खुंबू ऑइस फॉल येथील मार्ग खुला झाला आहे. मंगळवारी रात्री पहिली टीम कॅॅम्प एकच्या दिशेने रवाना झाली. कस्तुरी ही आज, बुधवारी रात्री या कॅॅम्पकडे रवाना होणार आहे. दरम्यान, तिने ३१ मार्चपासून एव्हरेस्टच्या भोवतालची डिंगबोच (१४४६८ फूट), आयलँड पिक समीट (२०,३०५ फूट), चुखुंग (१५,५१८ फूट) आणि लोबुचे (१६,२१० फूट) अशी शिखरे सर केली आहेत.
फोटो (२७०४२०२१-कोल-कस्तुरी सावेकर (गिर्यारोहक)