कोल्हापूर : ‘केएसए’ लीग फुटबॉल स्पर्धेतील आज, रविवारी झालेल्या सामन्यात बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळावर खंडोबा तालीम मंडळाने २-१ अशी अत्यंत चुरशीच्या लढतीत मात केली. हे दोन्ही गोल ‘खंडोबा’च्या कपिल साठेने केले, तर पॅट्रियट स्पोर्टस्ने उत्तरेश्वर वाघाची तालीम संघावर ३-० अशी एकतर्फी मात केली.छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या ‘केएसए’ लीग फुटबॉल स्पर्धेत तुल्यबळ पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात सामना झाला. खंडोबाच्या चंद्रशेखर डोका, अर्जुन शेतगावकर, श्रीधर परब यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. पाटाकडील ‘अ’कडून उत्सव मरळकर, रूपेश सुर्वे, हृषिकेश मेथे पाटील, सैफ हकीम यांनी गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, खंडोबाचा गोलरक्षक विशाल नारायणपुरे याने उत्कृष्ट गोलरक्षणाची चुणूक या सामन्यात दाखविली. ३९ व्या मिनिटाला कपिल साठेने गोल करीत १-० अशी आपल्या संघास आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात पाटाकडील ‘अ’कडून रूपेश सुर्वे, उत्सव मरळकर, हृषिकेश पाटील, सैफ हकीम यांनी अनेक चढाया केल्या. मात्र, खंडोबाच्या शकील पटेल, शशांक अश्वेकर आणि गोलरक्षक नारायणपुरे यांनी त्या परतावून लावल्या. पुन्हा खंडोबाच्या कपिल साठेने दुसरा गोल नोंदवत २-० अशी आघाडी घेतली. शेवटच्या जादा ५ मिनिटांत पाटाकडील ‘अ’च्या हृषिकेश पाटीलने गोल नोंदवला, परंतु ‘खंडोबा’ने हा सामना २-१ असा जिंकला. दुसरा सामना पॅट्रियट स्पोर्टस् विरुद्ध उत्तरेश्वर वाघाची तालीम मंडळ यांच्यात झाला. पॅट्रियटकडून नीलेश मस्कर, आदित्य साळोखे, रजत शेट्ये यांनी उत्कृष्ट चाली रचल्या. उत्तरार्धात पॅट्रियटकडून सय्यद मैनुद्दीन याने ४३ व्या मिनिटाला गोल करीत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. ६२ व्या मिनिटास पॅट्रियटच्या आदित्य साळोखेने गोल नोंदवत २-० अशी आघाडी घेतली. ७६ व्या मिनिटास पॅट्रियटकडून सौरभ पोवारने संघाचा तिसरा गोल नोंदवीत विजयावर शिक्कामोर्तब केले. (प्रतिनिधी)
कपिल ठरला ‘खंडोबा’च्या विजयाचा शिल्पकार
By admin | Updated: December 14, 2014 23:43 IST