कोल्हापूर : कणकवली पोलीस ठाण्याच्या कोठडीतून पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेल्या चोरट्यास शनिवारी सकाळी राजाराम तलाव येथे कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी नीलेश रामनाथ कोरगावकर (वय ४०, रा. धारगड, पेडणे-गोवा) असे त्याचे नाव आहे. वारगाव-रोडयेवाडी येथील काळंबादेवी मंदिरातील फंडपेटी फोडल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी नीलेश कोरगावकर याला अटक केली होती. गुरुवारी (दि. ३) पहाटे पोलीस कोठडीच्या दरवाजाला कुलूप नसल्याचे पाहून त्याने तेथून पलायन केले होते. याप्रकरणी पोलिसांची दोन पथके गोवा व कोल्हापूर-कागल येथे गेली होती. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांना संशयित कोरगावकर हा राजाराम तलाव परिसरात फिरत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक विकास देशमुख, रमेश खुणे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र पालवे, फौजदार विजय कोळी, कॉन्स्टेबल राजू शेट्टे, शिवाजी खोराटे, सुरेश चव्हाण, राजेंद्र हांडे, राजेश आडुळकर, संजय कुंभार यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या पथकाने राजाराम तलाव परिसरात जाऊन खात्री केली असता पोलिसांना पाहून एक संशयित पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करून त्याला पकडले असता तो कणकवली पोलीस ठाण्यातून पलायन केलेला आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्याला रात्री उशिरा कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)
कणकवलीतील चोरट्यास अटक
By admin | Updated: December 6, 2015 01:39 IST