कोल्हापूर : एखाद्या अधिकाऱ्याची एखाद्या गोष्टीशी किती बांधीलकी असू शकते याचे उदाहरण राज्याचे भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी रविवारी घालून दिले. ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी रविवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता अभियान राबवले.
कलशेट्टी यांनी पावणे दोन वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये आयुक्त असताना दर रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली होती. या मोहिमेचा रविवारी ८४ वा आठवडा होता. या मोहिमेमध्ये नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी माेठा सहभाग दिल्याने हा उपक्रम कोल्हापूरची वेगळी ओळख बनला आहे. कलशेट्टी बदलीनंतर विभागाच्या कामकाजानिमित्त पहिल्यांदा शनिवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते. त्यावेळी या इमारतीचा परिसर अस्वच्छ असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ त्यांनी या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याची सूचना वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषीराज गोसकी यांना केली. त्यानुसार रविवारी सुट्टी असूनही सर्व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता मोहीम राबवून हा परिसर चकाचक केला. या परिसरात असलेलं खुरटं गवत, खुरटी झाडी तसेच कचरा व प्लास्टिक गोळा करून हा परिसर स्वच्छ केला. यावेळी सहसंचालक मिलिंद देशपांडे, शिवलिंग चव्हाण, नंदकुमार पाटील, स्वच्छतादूत अमित देशपांडे, किशोर कदम, जे. बी. माळी, अतुल जाधव, श्रद्धा मंडलिक, साक्षी जाधव, सुनील पाटील, श्री. कोळी यांच्यासह सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
०६१२२०२० कोल मल्लिनाथ कलशेट्टी
राज्याचे भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी रविवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता अभियान राबवले.