कळंबा कारागृहात गेल्या दहा दिवसांत तीन वेळा मोबाईल, चार्जिंग बॅटऱ्या, गांजा, आदी साहित्य कैद्यांना पुरविल्याचे उघड झाले. आतील पार्ट्यांचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे कारागृहाची सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली आहे. कारागृहात जहाल, गंभीर गुन्ह्यांतील कैदी आहेत. त्यांना विविध मार्गाने वस्तू पुरविण्यासाठी छुपी यंत्रणा सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. यामुळे कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी गेल्याच आठवड्यात कळंबा कारागृहाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी सुरक्षेबाबत विशेष सूचना दिल्या होत्या.
त्या पार्श्वभूमीवर कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. इंदूरकर हे लंडन येथे अभ्यासासाठी गेले होते. तेथील कारागृहात सुरक्षेसाठी श्वानाची मदत घेतली जाते. त्याप्रमाणे कळंबा कारागृहाच्या सुरक्षेबाबतही विशेष श्वानाची मदत घेतली जाणार आहे. अठरा महिन्यांचे ‘असूर’ हे भारतीय जातीचे श्वान फलटण येथून आणले आहे. त्याच्याकडे अमली पदार्थ, स्फोटके, मोबाईल फोन, हत्यारे, संशयित व्यक्ती ओळखण्याची कसब आहे. त्यामुळे हे श्वान कारागृहाच्या तटबंदीबाहेर २४ तास गस्त स्वरूपात पहारा देणार आहे. त्यामुळे बाहेरून वस्तू कारागृहात फेकण्यावर त्याची नजर राहणार आहे.
दहा कर्मचाऱ्यांचे काम
कारागृहाबाहेर २४ तास हा ‘असूर’ श्वान बंदोबस्त देणार असून, तब्बल दहा सुरक्षा रक्षकांचे काम करण्याची त्याची क्षमता आहे. त्याचा देखभालीचा दरमहा खर्च हा पाच हजार रुपये आहे, अशी माहिती कारागृह अधीक्षक इंदूरकर यांनी दिली.
फोटो नं. ०२०१२०२१-कोल-डॉग कळंबा जेल