कळंब : यवतमाळ जिल्ह्यातील कळंबनजीक थांबलेल्या ट्रकवर स्विफ्ट कार आदळून झालेल्या भीषण अपघातात विवाहित मुलगीसह पिता ठार, तर तीनजण जखमी झाले. अपघातातील मृत आणि जखमी कागल (जि. कोल्हापूर) येथील आहेत. मृतांमध्ये स्वाती सुनील मांगले (वय ४०) आणि सेवानिवृृत्त जवान पांडुरंग बापू साठे (६५, रा. कागल, जि. कोल्हापूर) यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुनील बंडूजी मांगले (४५), दीपक सुनील मांगले (११) आणि वैभव सुनील मांगले (६) यांना उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले. यवतमाळ-नागपूर मार्गावर कळंबनजीकच्या माथा वस्तीजवळ शनिवारी पहाटे ६ वाजता हा अपघात झाला. सुनील मांगले कामठी (जि. नागपूर) येथे सैन्यदलात कार्यरत आहेत. हणबरवाडी येथून स्विफ्ट कारने (एमएच १२ एफएस ९०९९) कामठीला जात होते. ही कार पांडुरंग साठे चालवित होते. दरम्यान, येथून एक किलोमीटरवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थांबलेल्या ट्रकवर (यूपी ७८ सीटी १२२१) आदळली. या अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला. यात स्वाती मांगले आणि पांडुरंग साठे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह जेसीबीने ओढून बाहेर काढावे लागले. नागरिकांनी जखमींना कळंब ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयात व तेथून नागपूरला हलविण्यात आले. अपघातग्रस्त कारमध्ये सोन्याचे दागिने आढळून आले. मृत महिला आणि जखमींच्या अंगावरील आणि डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने पोलिसांजवळ सुरक्षित आहेत. जमादार चंद्रशेखर ठाकरे यांनी ते ताब्यात घेतले. (तालुका प्रतिनिधी) कागलवर शोककळा कागल : पांडुरंग साठे व विवाहित मुलगी स्वाती सुनील मांगले हे भीषण अपघातात ठार झाल्याचे वृत्त येथे येताच येशीला पार्क परिसरात तसेच साठे यांचे गाव हणबरवाडी (ता. कागल) येथे दु:खाचे सावट पसरले. अपघाताचे वृत्त मिळताच नातेवाईक, मित्र यवतमाळकडे रवाना झाले. पांडुरंग साठे सेवानिवृत्त जवान आहेत. निवृत्तीनंतर काही काळ शाहू साखर कारखान्यात चालक म्हणून नोकरी करीत होते. त्यामुळे ते येथील येशीला पार्कात राहात होते. त्यांचे जावई सुनील मांगले यांचे गाव माद्याळ (ता. कागल) आहे. ते सैन्यात आहेत. नागपुरात ते नोकरीस आहेत. पांडुरंग साठे यांच्या दुसऱ्या मुलीचे लग्न कागल येथे झाले. ६ जानेवारीला स्वागत समारंभही झाला. सुनील यांनी नवीन स्विफ्ट कार खरेदी केली होती. ती नागपूरला घेऊन जाण्यासाठी त्यांनी सासरे साठे यांना सोबत घेतले. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सासरा, जावई, मुलगी, दोन नातू रवाना झाले होते. कळंब येथे शनिवारी सकाळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. (प्रतिनिधी)
कागलचे बाप-लेक अपघातात ठार
By admin | Updated: January 10, 2016 01:05 IST