कागल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावातून मी दक्षिण मतदारसंघातून आमदारकी लढविली. अवघ्या २३ दिवसांत या नवख्या मतदारसंघात पोहोचणे मला एकट्याला शक्य नव्हते. अनेक परिचित-अपरिचित हितचिंतकांच्या प्रयत्नातून हे घडले. यासाठी कुटुंबीयांच्याबरोबर सासू-सासरे, मेव्हुणे यांचेही योगदान लाभले. त्यामुळे कागलकरांसाठी मी घरचाच आमदार आहे. त्यांनी हक्काने कामे सांगावीत, असे उद्गार आमदार अमल महाडिक यांनी काढले.येथील जय शिवराय शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने यशवंतराव घाटगे विद्यालयात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष आणि अमल महाडिक यांचे सासरे श्रीमंत मृगेंद्रसिंहराजे घाटगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शौमिका महाडिक, अखिलेश घाटगे प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मृगनयनाराजे घाटगे होत्या.यावेळी आमदार अमल महाडिक म्हणाले की, विधानसभेत माझ्यापेक्षाही लहान वयाचे आमदार नव्याने निवडून आले आहेत. नरेंद्र मोदींजींच्या प्रेरणेतून हे घडले आहे. १९९६ पासून मी सार्वजनिक कार्यात आहे. कै. अजितसिंह घाटगे यांनी कागलमध्ये हे शैक्षणिक कार्य जय शिवराय शिक्षण प्रसारक या संस्थेच्या माध्यमातून केले आहे. तेथे आज, गुरुवारी माझा सत्कार होतो आहे. माझ्या निवडणुकीसाठी कागलमधूनही अनेकांनी आपापल्या पद्धतीने योगदान दिले आहे. ते मी विसरणार नाही. गंगा नदीप्रमाणे पंचगंगा नदीही प्रदूषणमुक्त करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. संस्थेचे सचिव पी. बी. घाटगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शंकरराव गुरव, शौमिका महाडिक यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास शिवाजी भोसले (कणेरावाडी), सुनील पाटील, नगरसेवक संजय कदम, जयसिंग घाटगे, आप्पासाहेब भोसले, एस. डी. पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. अनुराधा कदम यांनी आभार मानले.लायकी आणि पद...या कार्यक्रमात शौमिका महाडिक यांनी उत्स्फूर्तपणे भाषण करीत जणू माहेरच्या लोकांसमोर अंत:करणच मोकळे केले. त्या म्हणाल्या की, जिल्हा परिषद अध्यक्षपद काय असते, हे मला माहित नव्हते. फक्त लाल दिव्याची गाडी येणार एवढेच माहीत होते; पण दुर्दैवाने हे पद त्यांना (अमल महाडिक यांना) मिळाले नाही. खूप वाईट वाटले. मी देवाला म्हटले, देवा या पदाचीही आमची लायकी नाही का ? पण, देवाने काही दिवसांतच आमदारकीचे पद देऊन जिल्हा परिषद अध्यक्षपदापेक्षा तुमची लायकी मोठी आहे, हेच दाखवून दिले. म्हणून तरमाझ्या शाळेत माझा ‘सौभाग्यवती आमदार’ म्हणून आज सत्कार झाला.
कागलकरांनी हक्काने कामे सांगावीत : महाडिक
By admin | Updated: November 28, 2014 00:11 IST