कोल्हापूर : कागल परिसरात मोटारसायकलवरून येणाऱ्या दोघांना देशी बनावटीचे पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी काल, सोमवारी सायंकाळी अटक केली. सतनामसिंग प्रतापसिंग बावरी (वय २६, रा. देसाई कॉलनी, कागल, मूळ राहणार शेंदला, ता. मेहकर, जि. बुलडाणा) व तानाजी दिनकर यादव (२५, रा. काळम्मावाडी वसाहत, कागल, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून बेकायदेशीर दोन देशी बनावटीचे पिस्तूल, एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व १८ जिवंत काडतुसे, एक दुचाकी असा एकूण तीन लाख ९३ हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. दरम्यान आज, मंंगळवारी न्यायालयाने दोघांना मंगळवार (दि. ८) पर्यंत पोलीस कोठडी दिली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, पुणे-बंगलोर महामार्गावरील कागल परिसरातील हॉटेल मयूर पॅलेसच्या आवारात एक इसम मोटारसायकल (नंबर जी ए ०१ क्यू-७६४९) सरदारजीला पिस्तूल विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोन पथके तयार केली. सायंकाळी ही पथके त्याठिकाणी गेली असता संशयित सतनामसिंग बावरी व तानाजी यादव हे मिळून आले. त्यांच्या कब्जातील देशी बनावटीचे पिस्तूल, रिव्हॉल्वर व काडतुसे ताब्यात घेतली. या आरोपींकडे मिळून आलेली अग्निशस्त्रे-काडतुसे त्यांनी कोठे तयार केली आहेत? कोणाकडून आणली आहेत? कोल्हापूर जिल्ह्णात तसेच इतर जिल्ह्णांत कोणाकोणाला विक्री केली आहेत? त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. हा गुन्हा कागल पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. आज मंगळवारी दोघांना न्यायालयात हजर केले असता आठ जुलैपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रमेश ढाणे, महेश कोरे, मोहन पाटील, शमशुद्दीन पठाण, लक्ष्मण धायगुडे, संजय कुंभार, राजू बेंद्रे, राजू पालखे, अनिल ढवळे आदींनी केली.
कागल परिसरात दोघांना पिस्तूल, रिव्हॉल्व्हरसह अटक
By admin | Updated: July 2, 2014 00:41 IST