कोल्हापूर : शासनाच्या न्याय व विधि खात्याच्यावतीने आज, बुधवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कारभाराची अंबाबाई मंदिर व जोतिबा मंदिराशी संबंधित व्यवहारांची चौकशी करण्यात आली. उद्या ते सावंतवाडीला भेट देणार असून हे अधिकारी तीन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी दहाच्या दरम्यान आठ अधिकारी अंबाबाई मंदिरात आले. त्यानंतर त्यांनी समितीच्या मुख्य कार्यालयातील सन २००८ मध्ये देवस्थान समितीने केलेली १८ जणांची बेकायदा नोकरभरती, लाडू प्रसादाचे टेंडर अशा सर्व कागदपत्रांची तपासणी केली. काही महिन्यांपूर्वी देवस्थान समितीच्या अध्यक्षांसाठी खरेदी करण्यात आलेली इनोव्हा गाडी, पेटीतील रक्कम या सगळ््या व्यवहारांची चौकशी करण्यात आली आहे. मंदिरातील या तपासणीनंतर हे अधिकारी जोतिबा देवस्थानला रवाना झाले. उद्या, गुरुवारी हे अधिकारी सावंतवाडी येथील देवस्थानच्या कार्यालयास व तेथील मंदिरांना भेटी देणार आहेत. देवस्थानकडे दोन गाड्या असताना अध्यक्षांसाठी स्वतंत्र गाडी खरेदी करण्यात आली. बेकायदा नोकरभरतीचा प्रश्न तर गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित आहेत. दानपेट्या, खंडाची प्रक्रिया, समितीच्या व्यवहारात नसलेला ताळमेळ, पैशांचे व्यवहार, देवीला अर्पण केलेल्या चांदीची कमी वजनाने दिलेली पावती, मर्जीतल्या कर्मचाऱ्यांवर मेहेरबानी, अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या, ड्रायव्हरची नेमणूक, अशा देवस्थान समितीमध्ये सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराच्या तक्रारी यापूर्वी अनेकदा न्याय व विधिकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या समितीने समितीच्या अंतर्गत असलेल्या मंदिरांच्या कारभाराची चौकशी केली. ( प्रतिनिधी ) ५सदस्य अनभिज्ञ न्याय व विधि खात्याचे अधिकारी येणार असल्याची माहिती समितीच्या एकाही सदस्याला देण्यात आलेली नाही. आज, संध्याकाळी पत्रकारांनी सदस्यांना विचारले असता त्यांनी आम्हाला विषय माहीत नसल्याचे सांगितले. उद्या (शुक्रवार) हे अधिकारी देवस्थानच्या सदस्यांशी बैठक घेणार असल्याचे समजते.
न्याय-विधि खात्याकडून देवस्थानची चौकशी
By admin | Updated: November 20, 2014 00:01 IST