कोल्हापूर : लग्न समारंभात गर्दीचा फायदा घेत लहान मुलांच्या मदतीने महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या मध्यप्रदेशातील महिला चोरट्यास सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. बॉबी अशोक सिसोदिया (वय ३५, रा. कडिया, ता. पचोर, जि. राजगड - मध्यप्रदेश) असे तिचे नाव आहे. तिच्याकडून २ लाख किमतीचे सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. याबाबत पोलिसांनी सांगितले, एक महिन्यापूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या पीछाडीस असलेल्या श्री राम मंगल कार्यालयात लग्नसमारंभ होता. या समारंभातून काही महिलांच्या दागिने असलेल्या पर्स चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते व त्यांचे सहकारी या चोरट्यांच्या मागावर होते. त्यांनी मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये लहान मुले महिलांच्या हातातील पर्स चोरून घेऊन जाताना दिसले. ते कार्यालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या दोन महिलांच्या हातामध्ये पर्स देत असतानाही सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रीत झाले होते. त्या वर्णनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सोमवारी कोल्हापूर रेल्वे स्टेशन परिसरात संशयित वाटणाऱ्या व्यक्तींची तपासणी करून सोडत होते. यावेळी एक महिला संशयितरीत्या फिरताना दिसली. तिच्याकडे बारकाईने चौकशी केली असता तिच्याजवळ असलेल्या गाठोड्यात सात तोळे सोन्याचे दागिने, ४२ ग्रॅम वजनाची चांदीची लक्ष्मीची मूर्ती मिळाली. ते दागिने कुठून आणले याबाबत विचारपूस केली असता तिने एक महिन्यापूर्वी श्री राम मंगल कार्यालयात लग्नसमारंभ होता. यावेळी येथील महिलांचे दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर या महिलेस पथकाने राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित महिलेचे रॅकेट मोठे आहे. तिच्या अन्य महिला साथीदार व लहान मुलांचा पोलीस शोध घेत आहेत. या महिला कोल्हापुरात कधीपासून वास्तव्यास आहे. त्यांनी आणखी कुठे चोऱ्या केल्या आहेत, तिला यामध्ये आणखी कोणाचे सहकार्य आहे. ही महिला लग्नकार्याच्या महिन्यात कोल्हापुरात येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. माहिती सखोल पोलीस घेत आहेत. रेल्वे स्टेशनवर मुक्काममध्यप्रदेशमधील कडिया गावातील महिला व पुरुषांनी महाराष्ट्राला ‘टार्गेट’ केले आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्णांमध्ये या लोकांचे वास्तव्य आहे. लग्न, साखरपुडा, वाढदिवस किंवा अन्य कोणताही कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांची गर्दी दिसली की त्याठिकाणी लहान मुलांच्या मदतीने ते चोऱ्या करून पुन्हा रेल्वेने गावी जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संशयित बॉबी सिसोदिया ही अन्य दोन महिला व चार लहान मुलांसोबत रेल्वे स्टेशनच्या पिछाडीस फुटपाथवर मुक्काम करायची.
दागिने चोरणाऱ्या महिलेस अटक
By admin | Updated: January 12, 2016 00:57 IST