कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलाची आंतरराष्ट्रीय महिला धावपटू जयश्री बोरगी हिने व्हर्जिनिया (अमेरिका) येथे भरविण्यात आलेल्या विश्व पोलीस व फायर गेम्समध्ये धावण्याच्या स्पर्धेत शनिवारी तीन सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक पटकावून नवा विक्रम प्रस्थापित केला. अमेरिकेतील फेअरफॅक्स राज्यातील व्हर्जिनिया येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत १८ ते २९ या वयोगटात भारतीय पोलीस दलातून सहभागी झालेल्या जयश्री बोरगी हिने ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात पोलंडच्या वोजोटूवूच्च अॅना हिला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकाविला. फेअरफॅक्स राज्यातील जॉर्ज मेसन विद्यापीठाच्या मैदानात झालेल्या या स्पर्धेत बोरगी हिने ११:०३:२१ मिनिटे एम इतकी, तर वोजोटूवूच्च अॅना हिने ११:३८:२९ मिनिटे इतकी वेळ नोंदविली आहे. यापूर्वी याच प्रकारात डब्ल्यू. रहमान या भारतीय पोलीस दलातील धावपटूने ११:३१:२९ मिनिटे इतकी विक्रमी वेळ नोंदविली होती. हा विक्रमही बोरगी हिने मागे टाकला आहे. यासह तिने ५००० मीटर व १०,००० मीटर धावण्याच्या प्रकारातही सुवर्णपदक पटकाविले. पाच हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत मात्र ती दुसऱ्या स्थानावर राहिली. अशी कामगिरी करणारी महाराष्ट्र पोलीस दलातील ती एकमेव महिला ठरली आहे. (प्रतिनिधी)
जयश्री बोरगीची अमेरिकेत ‘तिरंगी’ कामगिरी
By admin | Updated: July 5, 2015 01:20 IST