कोल्हापूर : कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (एसटीपी) शुद्ध झालेले पाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईनच्या चेंबरचे काम पूर्ण करण्यासाठी जयंती नाल्यातील दूषित पाण्याचा उपसा गुरुवारपासून चार दिवस बंद करण्याचा आला आहे. नाला थेट नदीत सोडला जाणार असला तरी दूषित पाण्याची तीव्रता व व्याप्ती कमी करण्यात येत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मागील आठवड्यात राजाराम कारखान्याने सोडलेल्या मळीमिश्रित पाण्याचा तवंग ‘जैसे थे’ असताना आता जयंती नाल्यातील मैलामिश्रित पाण्याची त्यात भर पडणार आहे. नदीकाठच्या गावासह इचलकरंजीकरांना भविष्यात काविळीसारख्या आजारांचा सामना क रावा लागण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.जयंती नाला पंचगंगेत सोडल्यामुळे नदी प्रवाहित करण्यासाठी राधानगरी धरणातून दररोज १०० ते १२५ क्युसेक जादा पाणी सोडण्याची गरज आहे. मात्र, पाटबंधारे विभागाने जूनपर्यंतच्या पाण्याचे नियोजन केल्याने पाणी सोडलेले नाही. एसटीपी पूर्ण क्षमतेने सुरू करून पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी मार्गातील प्रमुख अडथळा दूर करण्याचे हे महत्त्वाचे पाऊल असल्याने, सर्व घटकांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे. ‘एसटीपी’तून प्रक्रिया होऊन बाहेर पडणारे पाणी नदीपर्यंत वाहून नेण्यासाठी दीड किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता पाईपलाईनवरील चेंबर्सचे काम सुरू आहे. शहरातील सांडपाणी नदीत मिसळल्याने नदीकाठच्या गावांना ऐन उन्हाळ्यात साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. मैलामिश्रित पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे पाण्यात दररोज क्लोरिन टाकण्यात येते. पाणी नदीत मिसळू लागल्यापासून क्लोरिनची मात्रा दुप्पट करण्यात आली. क्लोरिनच्या दुष्परिणामामुळे नागरिकांना आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)दक्षता घ्यापंचगंगेत मैलामिश्रित पाणी मिसळत असल्याने या पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यापूर्वी उकळून प्यावे, योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.आठवड्यात एसटीपी सुरू करणार : जलअभियंताकाम अंतिम टप्प्यात : चार चेंबर्सचे काम शिल्लक; रात्रंदिवस कामकोल्हापूर : कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्रांतील (एसटीपी) प्रक्रिया केलेले पाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांत शिल्लक ८० मीटरपेक्षा अधिक पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. पाईपलाईनवरील अकरा चेंबर्सपैकी चार चेंबर्सचे काम सुरू असून, येत्या आठ दिवसांत एसटीपी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी माहिती जलअभियंता मनीष पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.कसबा बावड्यातील ७६ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया क रणारे ७५ कोटींच्या एसटीपी केंद्राचे काम गेली साडेतीन वर्षे सुरू आहे. न्यायालयाने गेल्या दीड वर्षांत चारवेळा ‘डेडलाईन’ दिली. न्यायालयाने दिलेली ३१ जानेवारी २०१५ ची अंतिम मुदतीनंतर ३१ मार्चचा मुहूर्त ही टळला. सर्वोच्च न्यायालयात २३ एप्रिलला पंचगंगा प्रदूषणप्रश्नी सुनावणी आहे, तत्पूर्वी एसटीपी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. ‘एसटीपी’तून प्रक्रिया होऊन बाहेर पडणारे पाणी नदीपर्यंत वाहून नेण्यासाठी दीड किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचे गेली वर्षभर सुरू आहे. फेबु्रवारी ते मार्च महिन्यात पाईपलाईनचे काम पूर्ण करण्याबाबत सक्त सूचना ठेकेदारास दिल्या होत्या. अतिरिक्त दोन पोकलँडने खुदाई करूनही काम रखडले. जयंती नाल्यातून नदीत मिसळणारे सांडपाणी लवकरात लवकर बंद व्हावे, काम जलदगतीने पूर्ण व्हावे, यासाठी सर्व कामावर लक्ष ठेवून यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांनी दररोज ५० हजार प्रमाणे दंडात्मक कारवाई ठेकेदारावर केली. त्यामुळे पाईपलाईन टाकण्याच्या कामास युद्धपातळीवर सुरुवात झाली. कसबा बावडा एसटीपी केंद्र कोणत्याही स्थितीत त्वरित सुरू करण्यादृष्टीने रात्रं-दिवस काम सुरू आहे. पाईपलाईनवरील चार चेंबर्स काम पूर्ण झाल्यानंतर येत्या आठवड्यात एसटीपी पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
ठरल्याप्रमाणे जयंती नाला पंचगंगेत
By admin | Updated: April 10, 2015 01:05 IST