कुरुंदवाड : पंचगंगा नदीपात्रातील जलपर्णी शिरढोण पुलाला येऊन तटल्याने पुलाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी पुलाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन पुलाचे संरक्षित कठडे काढून टाकले व तुंबलेली जलपर्णी जेसीबी मशीनच्या साहाय्याने पुराच्या पाण्यात प्रवाहित करून पुलावरील दाब कमी केला. तहसीलदार मोरे यांच्या तत्परतेमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या चार दिवसांपासून पावसाने झोडपून काढल्याने पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे. पंचगंगा नदीतील जलपर्णी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येऊन शिरढोण-कुरुंदवाडदरम्यान पंचगंगा पुलाला तटली होती. सात ते आठ फूट जाडीचा जलपर्णीचा थर पाण्याच्या प्रवाहाने पुलाला दाबत असल्याने धोका निर्माण झाला होता. त्यामुळे शिवसेना शहरप्रमुख वैभव उगळे, स्वाभिमानी संघटनेचे विश्वास बालिघाटे आदींनी ही घटना तहसीलदार मोरे यांच्या लक्षात आणून दिल्याने मोरे यांनी पुलाला भेट देऊन पाहणी केली. पुलाच्या संरक्षित कठड्याला जलपर्णी तुंबल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. बांधकाम विभागाचे उपअभियंता जहॉंगीर बागवान यांनी पुलाचे दोन्ही बाजूचे लोखंडी संरक्षित कठडे तोडून काढत जेसीबी मशीनच्या सहाय्याने नदीपात्रातील जलपर्णी पुढे प्रवाहित केली.
फोटो -19062021-जेएवाय-01
फोटो ओळ - शिरढोण-कुरुंदवाडदरम्यान पंचगंगा पुलावर तुंबलेल्या जलपर्णीची पाहणी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी केली. या वेळी उपअभियंता जहॉंगीर बागवान, शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे, स्वाभिमानीचे विश्वास बालीघाटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.