कोल्हापूर: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्बंध कडक असल्याने सार्वजनिकरित्या जयंती उत्सव साजरा करता येत नसला तरी आज बुधवारी साजऱ्या होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याची जंगी तयारी दिसत आहे. जयंती समितीकडून घरातच राहून जयंती साजरा करा, असे आवाहन करण्यात आले आहे, तरीदेखील पूर्वसंध्येला गल्ल्या निळ्या झाल्या आहेत.
दरम्यान, आज जयंती समितीकडून बिंदू चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अभिवादन केले जाणार आहे. इतरांनी ऑनलाईनच अभिवादन करावे, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात कुठेही शोभायात्रा निघणार नाही, पण ग्रामीण भागात मात्र प्रशासनाचे नियम फारसे कठोर नसल्याने छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन समाजबांधवांच्या वतीने करण्याचे नियोजन केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज बुधवारी देशभर जयंती साजरी होत आहे. कोरोनाच्या निर्बंधामुळे ती भव्य दिव्य करण्यावर मर्यादा आल्या आहेत, तरीदेखील समाजबांधवामधील उत्साह काही कमी झालेला नाही. कोपऱ्या कोपऱ्यावर निळे ध्वज, पताका, डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा, पुतळे विक्री सुरू आहे. घराघरातही गोडाधोडाचे आणि बुद्ध वंदनेच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. आंबेडकर जयंती समितीकडून गेल्या तीन दिवसांपासून ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले जात आहे. आज बुधवारी जयंती दिनी त्याची सांगता होणार आहे.