कोल्हापूर : एकीकडे रविवारी दिवसभर सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनाची धांदल सुरू असतानाच दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या ‘यांचं करायचं काय’ या विवंचनेत कोल्हापूर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या चर्चेतून अखेर रात्री अकरा वाजता ठरले आणि मगच सोमय्या यांना कराडात उतरवले. मुंबईतून सुरू झालेल्या या ‘हाय होल्टेज ड्रामा’चा शेवट अखेर कराडात झाला.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जर सोमय्या कोल्हापुरात आले तर त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सोमय्या जर कोल्हापुरात आले तर राडा होणार हे निश्चित होते. त्यामुळे याचा ताण पोलीस प्रशासनावर येणार होताच. अशातच केंद्र सरकारनेही सोमय्या यांना सुरक्षा पुरवली असल्याने या संघर्षाला वेगळे वळण लागण्याची शक्यता होती. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यात सोमय्या यांना केलेली बंदी, लागू केलेले १४४ कलम या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी एक्स्प्रेस मुंबईतून सुटल्यानंतर इकडे कोल्हापुरात हालचाली वाढल्या.
सोमवारी काय होणार, याची झलक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्रीच दाखवून दिली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, आदिल फरास, राजू लाटकर यांनी कार्यकर्त्यांसह रेल्वे स्टेशनवर धाव घेऊन हातात कोल्हापुरी चप्पल घेऊन सोमय्या यांचा समाचार घेतला होता.
चौकट
पोलीस महानिरीक्षकांनी बोलावली बैठक
रात्री उशिरा पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. याचवेळी त्याआधी सांगली, सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांशीही चर्चा झाल्याचे समजते. कोणत्याही परिस्थितीमध्ये सोमय्या कोल्हापुरात येता कामा नयेत, यासाठी सर्व ते प्रयत्न करण्याचे ठरले. हे सर्व प्रकरण राजकीयदृष्ट्या तापलेले असल्याने शक्यतो समजावून सांगून आणि अगदी पर्यायच राहिला नाही तर बळ वापरून त्यांना उतरवायचे ठरले. त्यांना कराड, मिरज किंवा कुठे उतरवायचे, याबाबतही चर्चा झाली. अखेर कराड येथे उतरवण्यावर एकमत झाले.
चौकट
तिरूपती काकडे यांच्यावर जबाबदारी
सोमय्या यांची समजूत घालून उतरवण्याची जबाबदारी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्यावर सोपवण्यात आली. रात्री साडे अकरानंतर काकडे साताऱ्याकडे रवाना झाले. त्यांनी सातारा रेल्वे स्टेशनवरच महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये प्रवेश केला. तेथून कराडपर्यंत त्यांनी सोमय्या यांची समजूत काढली. त्यांना विनंती केली आणि अखेर सोमय्या यांना कराडमध्ये उतरवण्यात पाेलिसांना यश आले.
चौकट
भाजप ‘वेट अन्ड वॉच’च्या भूमिकेत
या पार्श्वभूमीवर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र ‘वेट अन्ड वॉच’च्या भूमिकेत होते. सोमय्या यांना पोलीस कोल्हापूर जिल्ह्यात येऊ देणार नाहीत, याची अटकळ सर्वांनीच बांधली होती. परंतु त्यातूनही सोमय्या आलेच तर कोणी काय करायचे, याचे नियोजन ठरलेले होते. मात्र, सोमय्या येण्याआधीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनांवर मात्र भाजपकडून टीका सुरू झाली.