कोल्हापूर : पोलीस मुख्यालय परिसरातील पावसाळ्यात वाढणारे गवत कापण्यास मैदान प्रमुखांनी विरोध केल्याने कापलेल्या गवताच्या पेंढ्या मैदानावर पडून आहेत. पैसे भरूनहीही गवत कापण्यास देत नसल्याने शेतकऱ्यांवर वैरणीसाठी फिरण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात पोलीस मुख्यालय परिसरात वाढणाऱ्या गवताचा लिलाव दरवर्षी केला जातो. बावड्यातील स्थानिक शेतकरी हे गवत आपल्या जनावरांसाठी चारा म्हणून वापरतात. यावर्षी कसबा बावड्यातील चार मुलांनी साडेआठ हजार रुपये लाइन अंमरदारला देत गवताचा लिलाव घेतला होता. त्यांनी गवत कापण्यास सुरुवात केली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी मैदानावर गवत कापत असताना क्रीडांगण प्रमुखांनी गवत कापण्याचा लिलाव झाल्याचा कोणताही आदेश नसल्याचे कारण देत संबंधित मुलांना गवत कापण्यास मज्जाव केला. विशेष म्हणजे कापलेले पन्नास ते साठ पेंढ्या गवतही नेऊ दिले नाही. दरम्यान या मुलांनी लिलावासाठी भरलेले साडेआठ हजार रुपये शासन दरबारी जमा झाले नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे हे पैसे गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चौकट : लिलाव झालाच नाही
या गवताचा लिलाव अद्याप करण्यात आला नसल्याचे समजते. मग वरिष्ठांना न कळवता परस्पर लाइन अंमलदाराने गवत कापण्यास कशी परवानगी दिली, असा सवाल उपस्थित होत आहे.
साफसफाईही करायची...
गवत कापणाऱ्या मुलांकडून गेल्या महिन्यात विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या बंगल्यातील तसेच फुटबॉल मैदानाच्या ट्रॅकची साफसफाई करून घेण्यात आली. त्यामुळे पैसे देऊन गवतही घ्यायचे आणि अधिकाऱ्यांचे बंगलेही साफसफाई करायचे या ओझ्याखाली ही मुले दबली आहेत.
कोट : गवत कापण्यास विरोध नाही
मैदानावरील गवताच्या लिलावाचे मागील वर्षीपेक्षा जास्त पैसे आले पाहिजेत, असे संबंधितांना मी सांगितले होते आणि तसे झालेही आहे. त्यामुळे गवत कापण्यास काही हरकत नाही. दोन दिवसांत चौकशी करून गवत कापण्यास परवानगी दिली जाईल.
-शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक
फोटो : १७ बावडा गवत
पोलीस मैदानावरील ५०-६० पेंढ्या गवत मुलांनी कापले होते. मात्र, क्रीडांगण प्रमुखांनी कापण्यास मज्जाव केल्याने पेंढ्या तशाच पडून आहेत.