लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यात चार नव्हे तर ४० केंद्रीय मंत्री केले आणि कोकणातील पंतप्रधान केला तरी शिवसेनेला काहीही फरक पडत नाही, असा टोला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे व भाजपला मंगळवारी येथे लगावला. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला एक नंरबचा पक्ष बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शहरात शिवसंपर्क अभियानच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शासकीय विश्रामगृहात हा कार्यक्रम झाला. जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री सामंत म्हणाले की, विरोधकांनी कितीही शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तरी त्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष न देता पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. पाच वर्षात जे छळले आणि अजूनही विरोधक म्हणून छळत आहेत, त्यांचे आगामी काळात १२ वाजवण्यासाठी तयारी करावी. शिवसैनिक कोणी अंगावर आल्यास शिंगावर घेत असतो. तो कधीही शिंग घेऊन पुढे जात नाही. तीन पक्षांचे सरकार असले तरी प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. यामुळे आगामी सर्वच निवडणुकीत शिवसेनेचे नाव कमी होणार नाही, याकडे लक्ष द्या.
दुधवडकर म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे जिल्ह्यातील दोन आमदारही गेले. ते औषधलाही शिल्लक राहिले नाहीत. यावरून कपटनीतीचा अंत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माजी आमदार क्षीरसागर म्हणाले की, गेल्या दोन महापालिकेच्या निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर झाल्याने कमी मतांनी शिवसेनेच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला; पण यावेळी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून घराघरात पक्ष पोहोचवत महापालिकेवर शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवण्याची तयारी शिवसैनिकांनी करावी.
माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, रविकिरण इंगवले, विजय देवणे यांची भाषणे झाली. गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव, डॉ. मिणचेकर, सामाजिक कार्याबद्दल हर्षल सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला. आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सत्यजित पाटील, ऋतुराज क्षीरसागर, मंगल साळोखे आदी उपस्थित होते. अंकुश निपाणीकर यांनी प्रास्ताविक केले. जयवंत हारूगले यांनी आभार मानले.
चौकट
गोकुळमधील मक्तेदारी मोडली
मंत्री सामंत म्हणाले की, गोकुळमध्ये आतापर्यंत विशिष्ट व्यक्तींचीच मक्तेदारी होती. ती मोडून काढली हे चांगले झाले. गोकुळमध्ये शिवसेनेचे सात संचालक झाले आहेत. यांनी नेहमी शेतकरी हितासाठी काम करीत राहावे. जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेच्या तीन सदस्यांना सभापती म्हणून संधी मिळाली. त्यांनीही आपल्या पक्षाला कसे झुकते माप मिळेल, याकडे लक्ष द्यावे.
चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका
स्वत:च्या ग्रामपंचायतमध्ये सत्ता नसलेल्यांनी आम्हाला शिकवू नये, अशी टीका मंत्री सामंत यांनी चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता केली. विधानसभेवेळी माझ्या पाठीत काही जणांनी खंजीर खुपसल्याने पराभव झाला. मंत्री पदाची संधी चालून आली होती, त्यावेळी एका नेत्याने विरोध केला, अशी टीका माजी आमदार क्षीरसागर यांनीही केली.