लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील ग्रामस्थांचे सोनतळी येथे पुनर्वसन केले. मात्र त्या जागेची प्रॉपर्टी कार्डे मिळत नसल्याने घरांच्या बांधकामासाठी बँकांकडून कर्जे मिळत नाहीत. यासाठी या जागेचे संबंधितांच्या नावांची प्रॉपर्टी कार्डे करून द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवाजी पुलावर आले असता, त्यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात १९८९ ला आलेल्या महापुरात प्रयाग चिखलीला मोठा फटका बसला होता. त्यानंतर शासनाने संबंधित पूरग्रस्तांना सोनतळी येथे घरे बांधण्यासाठी जागा दिल्या. जागांचे वाटप होऊन ३२ वर्षे झाली; मात्र अद्यापही शेती म्हणूनच सात-बारा पत्रकी नोंद आहे. प्राॅपर्टी कार्ड नसल्याने ग्रामस्थांना कर्ज मिळत नाही, परिणामी घरे बांधता येत नाहीत. तरी संबंधितांना प्रॉपर्टी कार्डे काढून द्यावीत. त्याचबरेाबर २०१९ मध्ये नुकसान झालेल्यांना अद्याप ९५ हजार रुपयांची मदत मिळालेली नाही. त्याशिवाय कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर कमान पद्धतीने पूल बांधावेत, या मागण्यांचे निवेदन प्रयाग-चिखली ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.