कोल्हापूर : महानगरपालिकेतील रस्त्याच्या कामातील कथित भ्रष्टाचार प्रकरणाची येत्या सात दिवसात वरिष्ठ स्तरावरून चौकशी लावावी व दोषींवर कडक कायदेशीर करावी अन्यथा भारतीय जनता पक्ष या सर्वांचा खरा भ्रष्ट चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भाजपच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे प्रभारी प्रशासक नितीन देसाई यांना शुक्रवारी दिला.
सामान्य जनतेच्या घामाच्या पैशाचा असा अपव्यय होत असताना प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे का, असा भाजपचा प्रश्न आहे आणि नागरिकांच्या हिताविरोधात जर कोणी काही करत असेल तर मग तो ठेकेदार असो, अधिकारी असो वा माजी पदाधिकारी असो त्यांना जनतेच्या दरबारात खेचल्याशिवाय भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही, असेही या निवेदनात म्हटले आहे.
करदात्याच्या घामाच्या पैशांचा अपहार नेमके कोण करत आहे, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली होती. हे पत्र देऊन आज एक आठवडा पूर्ण झाला, तरीही कोणतीच कारवाई झाल्याचे स्पष्टपणे दिसत नाही. याचा अर्थ प्रशासनातील काही अधिकारी या सर्व प्रकारात सहभागी असून, तेच यातील दोषींना लपवत आहेत असा होतो. हे सगळे सुरू असतानाच पुन्हा एकदा एका माजी पदाधिकाऱ्याने त्याच्या प्रभागातील एक सुमारे ३० लाख रुपयांचे काम निविदा निघण्यापूर्वीच सुरू केले असून, या प्रकाराचीही चौकशी होणे गरजेचे आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
प्रभारी प्रशासक देसाई यांना दिलेल्या निवेदनावर उपाध्यक्ष प्रदीप उलपे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील यांच्या सह्या आहेत.