कोल्हापूर: गोकुळचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर कार्यमुक्त होत असल्याने रिक्त होणाऱ्या जागेसाठी आज, शुक्रवारी मुलाखती होत आहेत. या जागेसाठी तब्बल ४० जणांचे अर्ज आले आहेत. गोकुळ शिरगावमधील गोकुळच्या मुख्य कार्यालयात ही मुलाखत प्रक्रिया होणार आहे.
विद्यमान कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांना आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती; पण गोकुळमध्ये सत्तांतरानंतर कार्यकारी संचालक बदलण्याच्या हालचाली वाढल्या. नवीन निवडीसाठी अर्जही मागविले होते. त्यानुसार तब्बल ४० जणांनी अर्ज केले आहेत. गोकुळ शिरगावमधील कार्यालयात स्वत: अध्यक्ष विश्वास पाटील, पूर्ण संचालक मंडळ आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे अधिकारी हत्तेकर यांच्या उपस्थितीत मुलाखतींची प्रक्रिया होणार आहे. सकाळी ११ वाजता मुलाखतींना सुरुवात होणार आहे.
दरम्यान, गुरुवारी सहायक व्यवस्थापक या एकमेव जागेसाठीही मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली. या पदासाठी देखील ५० अर्ज आले होते. छाननी होऊन यातील २२ जणांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. आता आज कार्यकारी संचालक पदासाठीची मुलाखत पूर्ण झाल्यानंतर दोन्ही पदांचा अंतिम निर्णय एकाच वेळी जाहीर केला जाणार आहे.