आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील हाजगोळी बंधाऱ्यावर लोखंडी संरक्षण ग्रील बसवावेत, अशी मागणी सरपंच उज्ज्वला संजय येसादे यांनी पाटबंधारे विभागाचे आजरा शाखा अभियंता यांच्याकडे केली आहे.
हिरण्यकेशी नदीवर हाजगोळी खुर्द गावाजवळ १९९२ मध्ये बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यावरून आजरा-ऐनापूर मार्गे गडहिंग्लज एस.टी.ची वाहतूक सुरू आहे. त्याचबरोबर लहान-मोठी वाहनेही याच बंधाऱ्यावरून दररोज ये-जा करीत असतात.
संबंधित बंधाऱ्याच्या बांधकामवेळी दोन्ही बाजूंना लोखंडी संरक्षण ग्रील बसविण्यात आले होते; पण २०१९ च्या महापुरात या पुलावरील संरक्षण ग्रील पूर्णपणे वाहून गेले आहेत. त्यानंतर पाटबंधारे विभागाने सदर बंधाऱ्यावार एक फूट उंचीचे सिमेंट काँक्रीटचे दगड उभे केले आहेत; पण या बंधाऱ्यावरील वाहतुकीला संरक्षण ग्रील नसल्यामुळे धोकादायक बनला आहे. पंधरा दिवसांपूर्वी हाजगोळी बुद्रूक येथील तरुण विजय घोडके याचा बंधाऱ्यावरून पडून मृत्यू झाला आहे. ही बाब गंभीर व दुर्दैवी असून अशा घटना होणार नाहीत याची गांभीर्याने दखल घेणे व संरक्षण ग्रील उभा करणे गरजेचे आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाने तातडीने संरक्षण ग्रील उभे करावेत, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
फोटो ओळी : हाजगोळी बंधाऱ्यावर संरक्षक ग्रील नसल्याने धोकादायक बनलेला बंधारा.
क्रमांक : ०४०५२०२१-गड-०३