कोल्हापूर : शिवपुत्र संभाजी राजांच्या स्फूर्तिदायी आयुष्यातील धगधगीत प्रवासाचा उलगडा करत संभाजीराजे यांच्या विरोधात पसरविण्यात आला खोटा इतिहास पुसणारे ‘नरशार्दुल राजा संभाजी’ नाटकाच्या विशेष प्रयोगास सोमवारी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात परिवर्तन कला फौंडेशनतर्फे या विशेष प्रयोगाचे आयोजन केले होते. स्वराज्याच्या सिंहासनावर रूढ झालेल्या छत्रपती संभाजीराजे यांचे बालपण ते त्यांच्या मृत्यूपर्यंतचे संपूर्ण चरित्र अत्यंत सफाईदारपणे नाट्यरूपात सादर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजे यांची आग्रावरून सुटका असो किंवा संभाजीराजे त्यांच्याविरोधात उठविण्यात आलेल्या अफवांचे प्रसंग दिग्दर्शकाने किती बारकाईने मांडल्याचा प्रत्यय क्षणा-क्षणाला येत होता. कोल्हापुरातील ५० कलाकारांना घेऊन नाटक तयार केले आहे. अत्याधुनिक प्रकाश योजना आहे. नाटकाचे लेखन इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, दिग्दर्शक किरणसिंह चव्हाण यांनी केले आहे. नाटकामध्ये संभाजीराजे यांची भूमिका हर्षल सुर्वे यांनी, तर रणजित गायकवाड यांनी छ. शिवाजी महाराजांची भूमिका केली. स्वराज्य, स्वातंत्र्य यांची प्रेरणा देणारे शंभूचरित्र ‘नरशार्दुल राजा संभाजी’ या नाट्यरूपात आणले आहे. कथा, कादंबऱ्या, चित्रपट, नाटकाद्वारे अन्याय सहन करत असणारे शंभूचरित्र सत्य इतिहासाच्या कसोटीवर उतरवून, या राजाच्या इतिहासावर चढविलेली दंतकथा आम्ही पुसून टाकल्या आहेत. - इंद्रजित सावंत, लेखक
संभाजीराजेंचा स्फूर्तिदायी प्रवास
By admin | Updated: December 22, 2015 00:52 IST