गडहिंग्लज : निष्ठेने व नि:स्वार्थीपणे केलेल्या कामाचे फलित सकारात्मक मिळते. बाबा आमटे यांनी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य केले आहे. त्यांच्या कार्यातून तरूणांना प्रेरणा मिळत असून त्याच मोठे समाधान वाटते, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.गडहिंग्लज येथे एका कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी डॉ. मंदा आमटे, गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष बापूसाहेब म्हेत्री, माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे व नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव होते. डॉ. आमटे म्हणाले, गडहिंग्लज हे एकेकाळी चळवळींचे माहेरघर होते. मात्र, आता चळवळी थंडावल्या आहेत. गडहिंग्लजमधून देवदासींची चळवळ उभी राहिली अन् त्यांना पेन्शन मिळाली. म्हणूनच आज त्यांची मुले उच्च शिक्षण घेत आहेत. मात्र, आज सर्वांनाच विवेक आणि विचार करण्याची वेळ आली आहे. म्हेत्री हे या चळवळीतील एक शिलेदार आहेत.डॉ. आमटे दाम्पत्यांच्या हस्ते बापूसाहेब व त्यांच्या पत्नी बेबीताई म्हेत्री यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती अमर चव्हाण, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, विठ्ठल बन्ने, सुरेश शिपूरकर, राजा शिरगुप्पे, रत्नमाला घाळी, अजित विठेकरी, बाबूराव शिंगे, रामा तरवाळ, एल. एस. कांबळे, आप्पासाहेब बारामती, बी. एन. पाटील-मुगळीकर, बाळेश नाईक, सदानंद पुंडपळ, आदी उपस्थित होते. हारूण सय्यद यांनी स्वागत केले. सुभाष धुमे यांनी प्रास्ताविक केले. अशोक भोईटे यांनी सूत्रसंचालन केले. बी. जी. चिघळीकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
बाबांच्या कार्यातून तरुणांना प्रेरणा
By admin | Updated: August 12, 2014 23:46 IST