कोल्हापूर : रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे यांनी सोमवारी गडावरील उत्खनन व विकासकामांची पाहणी केली. लॉकडाऊन काळात व रोपवे बंद असतानादेखील रखरखत्या उन्हात रोज अधिकारी व कर्मचारी गड पायी चढून येतात व अशा परिस्थितीतही जतन व संवर्धनाचे काम अविरतपणे सुरू ठेवतात, याबद्दल त्यांनी कौतुक केले.
गडावर सध्या हिरकणी बुरुजाजवळील श्रीगोंदा टाक्याच्या संवर्धनाचे काम सुरू असून पहिल्या टप्प्यात टाकीतील पंधरा फूट गाळ काढण्यात आला आहे. यादरम्यान टाक्यातील खडकांवर काही विशिष्ट रेषा आढळून आल्या, यावरून येथील दगड गडाच्या बांधकामासाठी वापरण्यात आल्याने तयार झालेल्या खड्ड्याला तलावाचे किंवा पाण्याच्या टाक्याचे स्वरूप देण्यात आल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. यावेळी संभाजीराजे यांनी या टाक्याचे जतन व संवर्धन अभ्यासकांना पुढील अभ्यासासाठी व संशोधनासाठी उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने करावे, अशा सूचना दिल्या.
यासह जिजामाता समाधी परिसर, पाचाड व खर्डी येथील तलावामध्ये रायगड विकास प्राधिकरण व नाम फाउंडेशन यांच्यातर्फे जलसंधारणाचे काम जलदगतीने सुरू आहे. यावेळी प्राधिकरणाचे वास्तुसंवर्धक वरुण भामरे, विशेष स्थापत्य पथकाचे स्वप्नील बुर्ले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
--
फोटो नं १००५२०२१-कोल-रायगड
ओळ : रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व खा. संभाजीराजे यांनी सोमवारी रायगडावरील विकासकामांची पाहणी केली.
--