जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगराला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी गुरुवारी भेट देऊन जोतिबा विकास आराखड्यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायत, देवस्थान समिती, पुजारी यांच्याशी चर्चा करून स्थानिक समस्या जाणून घेतल्या. दर्शन मंडपला जोतिबा विकास आराखड्यात प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जोतिबा डोंगरावर गुरुवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी प्रथमच भेट दिली. जोतिबाचे दर्शन घेऊन त्यांनी देवस्थान समितीकडून मंदिर परिसरातील विकासकामांची माहिती घेतली. भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून जोतिबा विकास आराखड्यामध्ये प्रथम दर्शन मंडप उभारणीसाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गुरव समाजाचे अध्यक्ष शिवाजीराव सांगळे यांनी सुंदर जोतिबा समितीचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. गावठाण्यातील लोकांची घरे ७-१२ वर नोंद नाहीत. गेली २० वर्षे हा प्रश्न प्रलंबित असून याची पूर्तता करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. जोतिबा डोंगरावरील कर्पुरेश्वर तलाव्याची पाहणी करून त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. मोहन कदम यांनी कर्पुरेश्वर तलाव जलपर्णीमुक्त केल्याची माहिती दिली. (वार्ताहर)
जिल्हाधिकाऱ्यांकडून जोतिबा आराखड्याबाबत पाहणी
By admin | Updated: July 31, 2015 01:08 IST