कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मेघोली धरण फुटून आठवडा उलटला तरी चौकशी समितीची स्थापनाच अद्याप झालेली नाही. पाटबंधारे विभागाला धरण फुटीतील दोषींचा शोधच घ्यायचा नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभाग ही चौकशी करेल, असे जाहीर केले होते.
या घटनेत एका महिलेचा मृत्यू होऊनही फुटीची चौकशी बेदखल केली आहे. मेघोली धरण १ सप्टेंबरला रात्री फुटले. एका महिला आणि १० जनावरांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. धरणाच्या खालील बाजूची जमीन खरडून गेल्याचे संबंधित शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर अगोदर जिल्हाधिकारी व नंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी नुकसानीची, धरणस्थळी भेट देऊन पाहणी केली व धरण फुटीची चौकशी करण्याची सूचना केली होती.
क्वाटर्झाईट प्रकारच्या भूस्तरामुळे धरण फुटल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढून खऱ्या दोषींना क्लीन चीट देण्याचा डाव पाटबंधारे प्रशासनाचा आहे का, अशीही शंका उपस्थित केली जात आहे. धरण फुटल्याने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही भरपाईही मिळालेली नाही.