लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये मागील तीन-चार वर्षांत भरती केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याचे आदेश नेत्यांनी सोमवारी आढावा बैठकीत दिले. कोणताही निर्णय घेताना मनमानी घेतल्यास याद राखा, अशा शब्दांत अधिकाऱ्यांची दोन तास झाडाझडती घेतली. ‘वारणा’, ‘राजारामबापू’ दूध संघांपेक्षा प्रतिलिटर २० पैसे जादा टँकरचे वाहतूक भाडे होते. ते तातडीने कमी करण्याचे आदेशही देण्यात आले.
‘गोकुळ’मध्ये सत्तांतर होऊन एक महिना तीन दिवस झाल्यानंतर राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या नेत्यांनी सोमवारी ‘अमृतकलश’ पूजन निमित्ताने दूध प्रकल्प कार्यालयात आढावा बैठक घेतली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठकीपूर्वी अधिकाऱ्यांना प्रश्नावली दिली होती, त्या माहितीनुसार संघाच्या अधिकाऱ्यांनी नेत्यांसमोर सादरीकरण केले.
सध्याचे दूध संकलन, अस्थापनासह इतर बाबींवर होणारा खर्च, संघामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, दूध वितरण व्यवस्था, वाहतूक व्यवस्था व त्यावरील खर्च संघाची सध्याची आर्थिक स्थिती, आदी बाबींची माहिती कार्यकारी संचालक व इतर अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.
तब्बल दोन तास झालेल्या बैठकीत मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री पाटील यांनी संघातील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवले. संचालक चुकीचे कारभार करीत असताना त्यांना रोखण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची होती, मग तुम्हीही चुकीचा कारभार का केला? पूर्वीच्या सवय चालणार नाही, मनमानी निर्णय खपवून घेणार नाही. संचालकांना विश्वासात घेऊन कामकाज करण्याची सूचना दोन्ही नेत्यांनी केल्या.
कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणार्थी कालावधी हा एक वर्षाचा असताना दोन महिन्यांत कर्मचाऱ्यांना कायम कसे केले? सहकारात ‘गोकुळ’ला कायदा वेगळा आहे का? नेते व संचालकांनी सांगितले म्हणून अधिकाऱ्यांनी कायदे मोडायचे का? असे संतप्त सवालही दोन्ही नेत्यांनी केले. असे प्रकार यापुढे खपवून घेणार नाही, असा सज्जड दमही दिला.
बैठकीला आरोग्य राज्यमंत्री राजेंंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, राजू आवळे, चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, संध्यादेवी कुपेकर, ए. वाय. पाटील, सुजित मिणचेकर, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील व संचालक उपस्थित होते.
अतिरिक्त कर्मचारी डोकेदुखी
मागील संचालक मंडळाने गरज नसताना मोठी नोकरभरती केल्याने कर्मचारी अतिरिक्त ठरत आहेत. सध्या २२५० कर्मचारी कार्यरत असून, त्याशिवाय ४००-५०० कर्मचारी ठोक मानधनावर घेतले जातात, असे बैठकीत सांगण्यात आले. अपवादात्मक हमाल व तांत्रिक कर्मचारी वगळता ठोक मानधनावर कामगार घेऊन नका, अशा स्पष्ट सूचना नेत्यांनी दिल्या आहेत.