कोल्हापूर : अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांची कारकिर्द वादग्रस्त आहे. त्यांनी अवैध मार्गाने मालमत्ता जमविली आहे. तिची चौकशी करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. मागासवर्गीय समाजाच्या लोकांचे जमीन अर्ज डावलणे व त्यांच्या प्रगतीस अडथळा निर्माण करणे ही बाब गंभीर आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यावर जाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करावा. दुपारी दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आल्यानंतर सेनेचे जिल्हा निमंत्रक सखाराम कामत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांना निवेदन दिले.मौजे चिंचवाड (ता. करवीर) येथील गट क्रमांक ६८५ संबंधी निवेदनाद्वारे सविस्तर माहिती देऊनही त्याची दखल घेतली नाही. हुपरी (ता. हातकणंगले) येथील ९८५/८ अ ही जमीन सरकारी कब्जात होती. ती देय असणाऱ्या धरणग्रस्ताऐवजी दुसऱ्या धरणग्रस्ताच्या नावे आदेश काढला आहे. पंडित आवळे यांची शाहूवाडी येथे बदली झालेली आहे; परंतु अद्याप बदलीच्या ठिकाणी ते जायला तयार नाहीत; कारण त्यांना अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार पाठीशी घालीत आहेत. मागासवर्गीय समाजाच्या लोकांचे जमीन अर्ज डावलणे व त्यांच्या प्रगतीस अडथळा निर्माण करणे ही बाब गंभीर आहे. त्यामुळे त्यांच्यावर जाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करावा. तसेच त्यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला.
अजित पवारांच्या मालमत्तेची चौकशी करा
By admin | Updated: December 12, 2015 00:10 IST