कोल्हापूर : महापालिकेने २६ नोव्हेंबर २०१६ मध्ये घेतलेल्या वर्ग १, वर्ग २ मधील सरळसेवा भरतीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुनर्घोषणेचा उल्लेख न करता परीक्षा घेतली. त्यामुळे सर्वसाधारण गटातील उमेदवारांवर अन्याय झाला आहे. या व २५ सप्टेंबर २०१४ पासून महापालिकेत झालेल्या नोकरभरतीची चौकशी करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने बुधवारी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. महापालिकेने आस्थापनेवरील गट अ व गट ब मधील निर्देशित केलेल्या संवर्गांतील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. यात सर्वसाधारण गटातील उमेदवार, परीक्षार्थी यांच्याबाबत, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचे कायदे व नियमावली यांचा प्रशासनाकडून चुकीचा अर्थ लावला. परिणामी या गटातील उमेदवारांवर अन्याय झाला. महापालिकेने महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नियमांची पायमल्ली केली. यापूर्वीही अर्थात २५ सप्टेंबर २०१४ पासून महापालिकेत केलेल्या नोकरभरतीची या पुनर्घोषणेच्या अनुषंगाने चौकशी व्हावी. यासह काही कारणांनी ही भरती प्रलंबित ठेवली. त्यावर पुनर्घोषणेच्या अनुषंगाने विचार व्हावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला. यावेळी सकल मराठा समाज, क्षेत्रीय मराठा चेंबर आॅफ कॉमर्स, क्षेत्रीय मराठा मेडिको चेंबर्स आॅफ कॉमर्स, क्षेत्रीय मराठा इंजिनिअर्स चेंबर आॅफ कॉमर्स, मराठा महासंघ, जिजाऊ ब्रिगेड, शिवाजी पेठ तालीम मंडळे, प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था, कॉमन मॅन संघटना, स्वाभिमान संघटना, बजरंग दल, हिंदू महासभा, हिंदू युवा या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)अशी आहे पुनर्घोषणा... आयोगाच्या दिनांक १ एप्रिल २०१४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या निकाल प्रक्रियेच्या कार्यपध्दतीनुसार लोकसेवा आयोगाच्या यापुढे घेणाऱ्या परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर मागासवर्गीयांना देय असलेली वय, परीक्षा शुल्क तसेच इतर पात्रता विषयक अटी, निकषासंदर्भात सवलत उमेदवाराने घेतली असल्यास अशा उमेदवारांची अमागास वर्गवारीच्या पदावर शिफारस करण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. ही सूचना यापूर्वी प्रसिध्द झालेल्या जाहिरातीत नमुद असेल त्या प्रकरणी व यापुढे प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातीसंदर्भात लागू असेल असे स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांनी २५ सप्टेंबर २०१४ ला प्रसिध्दीस दिले आहे.विद्यापीठातही तक्रार करणार..पुनर्घोषणेच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठातील भरतीबाबत माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घेऊन प्रथम विद्यापीठाच्या प्रशासनाला निवेदन दिले जाणार आहे. यानंतरही विद्यापीठ प्रशासनाने काहीच कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही स्वायत्त संस्था आहे. तर राज्य शासनाचे नियम वेगळे असतात. राज्याने जर आयोगासारखी पुनर्घोषणेच्या अनुषंगाने कोल्हापूर महापालिकेत नोकरभरती करावी, असे अध्यादेश काढले तर त्यानुसार कार्यवाही करू. याबाबत राज्य शासनाच्या सहसचिवांकडून मार्गदर्शन घेतले आहे. त्यामुळे सध्याची भरती प्रक्रिया योग्य आहे. - पी. शिवशंकर, आयुक्त, महापालिका२१ जागा व ४६८३ उमेदवारमहानगरपालिके त रिक्त असलेल्या पर्यावरण संवर्धन अधिकारी, सहायक अभियंता (यांत्रिकी), कायदा व विधि सेवा अधिकारी, सिस्टिम मॅनेजर (ई-प्रशासन), कीटकनाशक अधिकारी, कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील २१ जागांसाठी परीक्षा घेतली आहे. एकूण ४६८३ उमेदवारांनी कोल्हापूरसह राज्यातील रत्नागिरी, सांगली, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, जळगाव, नागपूर, मुंबई अशा ११ शहरांतील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा दिली, परंतु या परीक्षेचा निकाल राखीव ठेवला आहे.
नोकरभरतीत ‘ओपन’वर अन्याय
By admin | Updated: January 19, 2017 00:51 IST