कोल्हापूर : शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या कोल्हापूर शहरातील काही प्रकल्पांच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना राज्याच्या अर्थसंकल्पातून काहीच निधी मिळाला नाही. मात्र, तरी वेगवेगळ्या बजेटहेडमधून मागच्या वर्षी जवळपास ८० कोटींचा निधी उपलब्ध झाला, तर यावर्षी ३० कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. एकीकडे राज्यातील तीर्थक्षेत्रांना निधी दिला जात असताना अंबाबाई मंदिर विकासाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचा निधी देण्यास सरकारने अटी घातलेल्या आहेत.
सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पातून काही तरी ठोस निधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, कसलीच तरतूद नसल्यामुळे निराशा पदरात पडली; परंतु कोरोना काळात आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकरिता अर्थसंकल्पात यावर्षी ७५० कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यातून राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका यांना काही निधी दिला जाणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले व आयसोलेशन रुग्णालयास किमान आठ ते दहा कोटींचा निधी मिळण्याची आशा आहे.
राज्यातील इतर तीर्थक्षेत्रांना तसेच मंदिरांच्या संवर्धनासाठी निधीची तरतूद करण्यात आली असली तरी अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांस मात्र निधी जाहीर झालेला नाही. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करून त्याचा वापर सुरू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निधी देण्यात येणार आहे. राज्य सरकारने घातलेली अट अडचणीची ठरली आहे. सेफ सिटी, रंकाळा संवर्धन, शाहू मिलच्या जागेवरील नियोजित शाहू स्मारक, केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदान सुशोभीकरण ही दुसऱ्या टप्प्यातील कामे असून त्यांनाही काही निधी मिळालेला नाही.
विमानतळ विस्तारीकरणास ४० कोटी?
उजळाईवाडी विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणाच्या कामाचा तसेच नाइट लँडिंगच्या कामाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री पवार यांनी उल्लेख केला; परंतु निधी किती देणार आहे, याचा स्पष्ट उल्लेख केला नाही; परंतु नजीकच्या काळात ४० कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य करण्यात आल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
अर्थसंकल्पात नसले, प्रत्यक्षात येईल -पालकमंत्री
अर्थसंकल्पात कोल्हापूरला काही मिळाले नाही, असे जरी दिसत असले तरी वेगवेगळ्या बजेटहेडखाली माझ्यासह ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर प्रयत्नशील आहोत. गेल्या वर्षभरात शहरासाठी ८० कोटींचा निधी आणला आहे. यावर्षीदेखील ३० कोटींचा निधी आणणार आहोत. मुश्रीफ १५ कोटींचा निधी आणत आहेत. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही निधी देण्याचे मान्य केले आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
खिद्रापूरच्या मंदिरास मिळणार १२ कोटी-
शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या सवर्धनाकरिता निधी देण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. हा निधी १२ कोटींपर्यंत मिळणार आहे.