कळंबा : संभाजीनगर मार्गे क्रशर चौक व रंकाळा तलाव मार्गे पुढे जाणाऱ्या रस्त्यावर अवजड वाहनांना
बंदी घालण्यात आली असली तरी या रस्त्यावर नियम धाब्यावर बसवून दिवसरात्र बिनधास्तपणे ट्रक, उसाने भरलेले ट्रॅक्टर, दुधाचे टेम्पो, टँकर, मालवाहतूक डंपरची वाहतूक होत आहे. परिणामी, या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. विशेष म्हणजे अवजड वाहनांमुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाणही वाढल्याने हा रस्ता असुरक्षित बनला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अवजड वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा, वाहतूक कोंडी टळावी वाहतूक गतिशील व्हावी यासाठी सर्व अवजड वाहने संभाजीनगरपासून पुढे कळंबा जेल मार्गे रिंगरोडकडे मार्गस्थ करण्यात आली होती. संभाजीनगर ते रंकाळा तलावमार्गे रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मागील महिन्यापासून मात्र बंदी आदेश झुगारून बिनधास्त अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. ही वाहने प्रचंड वेगाने रस्त्यावरून धावत असल्याने अपघाताची भीतीही व्यक्त होत आहे.
चौकटी
१) मोठ्या अपघाताची भीती
अंबाई टँकनजीक रंकाळा उद्यानात सायंकाळी मोठी गर्दी असते. याच गर्दीतून मोठी अवजड वाहने वेगात मार्गस्थ होतात. यावर वेळीच कारवाई न केल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपनगरात संभाजीनगर, क्रशर चौक व हॉकी स्टेडियम असे तीन वाहतूक नियंत्रक सिग्नल असून, येथे मोठ्या अभावाने वाहतूक नियंत्रक पोलीस कारवाई करताना दिसून येतात. गर्दी व वाहतूक कोंडी असली तरच मोक्याच्या ठिकाणी दंडात्मक ‘वसुली’ करताना दिसतात. मात्र, बेशिस्त अवजड वाहनांवर कारवाई करताना ते शोधूनही सापडत नाहीत.
क्रशर चौक ते रंकाळा तलाव रस्ता सायलेंट झोन घोषित करण्यात आला असून, अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. जनजागृतीसाठी ठिकठिकाणी तसे फलक लावण्यात आले आहेत. संबंधित प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी.
प्रतिक्रिया शारंगधर देशमुख नगरसेवक
फोटो ओळ संभाजीनगर वाहतूक
संभाजीनगर ते रंकाळा तलाव या अवजड वाहतुकीस बंदी असणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर प्रशासनाच्या कारवाईचा धाक नसल्याने नियम धाब्यावर बसवत दिवसरात्र अवजड वाहतूक सुरूच आहे.