शिरोली : राज्यातील औद्योगिक वीजदरवाढ १० ते १३ टक्के म्हणजेच प्रतियुनिट सुमारे एक रुपयाने कमी होण्याची शक्यता आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार सुजित मिणचेकर यांनी आज, बुधवारी येथे पत्रकार बैठकीत दिली.राज्यातील उद्योगांना ४० टक्के वीजदरवाढीचा झटका महावितरणने दिला होता. राज्य शासनाने सबसिडी देणे बंद केल्याने ही दरवाढ करण्यात आली होती. या विरोधात राज्यभरातील उद्योजकांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर ही सबसिडी आणखी दोन महिन्यांसाठी वाढविण्यात आली होती. तिची मुदत डिसेंबरमध्ये संपली. त्यामुळे उद्योगांना जानेवारीची वीज बिले ४० टक्के दरवाढीने येणार आहेत. ही दरवाढ असह्य असल्याने दक्षिण महाराष्ट्रातील उद्योगांनी १२ जानेवारीपासून तीन दिवसांच्या बंदचे हत्यार उपसले होते. मात्र, आमदार मिणचेकर यांनी वीजदरवाढ कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला होता.आमदार मिणचेकर यांनी नागपूर येथे ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन उद्योजकांची भूमिका व उद्योगांसमोरील अडचणी सांगितल्या व दरवाढ कमी करण्याची विनंती केली. वीजदरवाढीमुळे उद्योग परराज्यांत जाऊ नयेत यासाठी तातडीने वीज दरवाढीबाबत ऊर्जामंत्री व उद्योगमंत्री यांच्याबरोबर चर्चा केली. उद्योजकांना दिलासादायक वीजदर मिळेल, असे आमदार मिणचेकर म्हणाले. यावेळी उद्योजक राजू पाटील, दीपक पाटील, गणेश भांभे, सुरेंद्र जैन उपस्थित होते. (प्रतिनिधी)वीज धोरण या महिन्यात होणार जाहीरवीज धोरण या महिन्यात जाहीर होणार आहे, त्यामुळे ही वीजदरवाढ प्रति युनिट एक रुपयाने म्हणजेच १० ते १२ टक्क्याने कमी करण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. येत्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्योजकांना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांतील बिलांमधील सवलत मिळालेली नाही याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ. त्यानंतर मुख्यमंत्री, वित्तमंत्री, ऊर्जामंत्री, उद्योगमंत्री आणि उद्योजक यांची मुंबईत बैठक घेऊ, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले असल्याची माहिती मिणचेकर यांनी दिली.
औद्योगिक वीजदरवाढ होणार कमी
By admin | Updated: January 15, 2015 00:35 IST