आजपासून आवकेत आणखी वाढ होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सोमवारी भाजीपाल्याची ६९५ क्विंटल आवक झाली. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात भाजीपाला सुरळीत होण्यास मदत झाली असून, पुराचे पाणी ओसरु लागल्याने मंगळवारी आवकेत आणखी वाढ होणार आहे. सोमवारी ऊन पडल्याने भाजी मंडईत लोकांनी भाजी खरेदीसाठी गर्दी केली होती.
महापुरामुळे राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक यंत्रणा कोलमडल्याने भाजीपाल्याची आवक थांबली होती. मात्र, पावसाने उसंत दिल्याने हळूहळू वाहतूक पूर्ववत होत आहे. पुराचे पाणी कमी होऊ लागल्याने एक-एक मार्ग मोकळे होत असून, वाहतुकीचे मार्ग खुले होत आहेत. त्यामुळे सोमवारी कोल्हापूर बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली. भाजीपाल्याची ६९५ क्विंटल, कांदा-बटाट्याची १८० क्विंटल व फळांची थोडीफार आवक झाली. त्यामुळे कोल्हापूर शहरासह, ग्रामीण भागात भाजीपाला काही प्रमाणात पोहोचला.
पावसाने उघडीप दिल्याने पुराचे पाणी ओसरु लागले आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्ग सुरळीत झाल्याने आज (मंगळवारी) भाजीपाल्याची आवक वाढणार आहे.
कोल्हापूर बाजार समितीत सोमवारची आवक
भाजीपाला : ६९५ क्विंटल
कांदा बटाटा : १८० क्विंटल
फळे : ३३ क्विंटल.
रविवारच्या तुलनेत दर कमी
रविवारी भाजीपाला कमी असल्याने दर तेजीत होते. मात्र, सोमवारी आवक काहीशी वाढल्याने तुलनेत दर कमी दिसत होते.