काेल्हापूर : केएमटी प्रशासनाकडून कोरोनामुळे बंद असलेल्या काही मार्गांवरील बसफेऱ्या पुन्हा सुरू केल्या जात आहेत. पाचगाव ते कदमवाडी, पाचगाव ते स्टँड, कळंबा ते शिरोलीमार्गे पेठवडगाव अशी बससेवा आज, सोमवारपासून पूर्ववत सुरू करण्यात येत आहेत.
कोरोनामुळे केएमटीची प्रवासीसंख्या घटली होती. सध्या साथ आटोक्यात येत असल्यामुळे प्रवाशांची संख्या काही अंशी वाढत आहे. शहर आणि उपनगरांमधील बससेवेमध्ये प्रवाशांच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येत आहे. यामध्ये आर.के.नगर ते शुगर मिल या मार्गावर प्रती अर्ध्या तासाच्या अंतराने, पाचगाव ते कदमवाडी मार्गावर प्रती २५ मिनिटांच्या अंतराने व कळंबा ते वडगाव मार्गावर (जाता-येता) प्रती अर्ध्या तासाच्या अंतराने प्रवाशांना बससेवा सुरू केली आहे. लक्षतीर्थ ते रुकडी माणगाव बसफेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली. गंगावेश ते कागल व्हाया तावडे हॉटेल या मार्गावरील फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
चौकट
पास विभाग पुन्हा सुरू
नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होत असल्यामुळे विद्यार्थी व कर्मचारी यांच्याकरिता पाससेवा सुरू केली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सवलत पास विभाग सुरू करण्यात आला असून विद्यार्थी व प्रवासी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केएमटीने केले आहे.
अजूनही ६७ बसेस बंदच
अपेक्षित प्रवासीसंख्या नसल्यामुळे केएमटीने प्रथम १० बसेस मार्गस्थ केल्या. यामध्ये प्रवाशांची संख्या पाहून वाढ केली जात आहे. आज, सोमवारी आणखी सात बसेस मार्गस्थ होणार आहेत. आता ३३ बसेस सेवेत असून ६७ बसेस अद्यापही वर्कशॉपमध्ये लावूनच आहेत.
रोजंदारी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
कायम कर्मचाऱ्यांना कामाची हमी आहे. मात्र, रोजंदारी कर्मचाऱ्यांनी काम केले तरच पगार मिळतो. निम्म्या बस बंद असल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
बातमीदार : विनोद