येथील सेंटरमध्ये उपचार घेत असणाऱ्या रुग्णांकडून येथे सुविधा पुरवा अशी मागणी होत आहे. मात्र, त्याकडे सध्या कोणाचेच लक्ष नसल्याचे वास्तव आहे. गगनबावडा येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात कार्यरत असणाऱ्या कोरोना केअर सेंटरमध्ये जनरेटरची सोय नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला की एवढ्या मोठ्या प्रशस्त इमारतीत मेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णावर उपचार करावे लागत आहेत. येथे रुग्णांना पिण्यासाठी स्वतंत्र कुलरची सोय नाही. ऑक्सिजन सिलिंडर आहेत. मात्र, ते लावण्याची तसदी घेण्यापेक्षा रुग्णाला कोल्हापूरची वाट वैद्यकीय अधिकारी वर्गाकडून दाखविली जात आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती गडगंज असणारे कोल्हापूर येथे खासगी उपचार करून घेण्यासाठी जात आहेत. कोल्हापूर येथे साधारणतः खासगी रुग्णालयात उपचारासाठी कमीत कमी दीड लाखाच्या पुढे खर्च येत आहे. गगनबावडा येथील कोरोना केअर सेंटरमध्येसुद्धा सर्वसाधारण कोरोना रुग्ण बरा होउ शकतो. मात्र, त्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून रुग्णाची मानसिकता वाढविण्याबरोबरच उपचारदेखील करणे गरजेचे आहे. गगनबावडा तालुक्यात आजअखेर दुसऱ्या लाटेत १६५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १४३ जणांनी या आजारावर मात केली आहे. तालुक्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २१आहे. तर एक रुग्ण या आजाराने मृत्यू पावला आहे. दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढण्यास नागरिकांबरोबरच प्रशासन जबाबदार आहे. यावेळी कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाचा होमआयसोलेशनच्या नावाखाली होत असलेला मुक्त संचार. स्थानिक ग्रामकमिटीचे होत असलेले दुर्लक्ष या बाबी कारणीभूत आहेत. अधिकारीवर्गाला या लाटेकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार कधी? असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. जबाबदार अधिकारीवर्गाने कोरोना केअर सेंटरला भेट देऊन येथील गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे.
गगनबावडा तालुक्यात गैरसोयीच जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:25 IST