ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 8 - अॅट्रॉसिटी कायदा कोणालाही भीती दाखविण्यासाठी वा त्रास देण्यासाठी नसून, तो अनुसूचित जातीजमातीसाठी संरक्षण कवच आहे. त्यामध्ये सुधारणा करण्यापेक्षा मराठा समाजातील नेत्यांनी जातीयवादी समाजमन सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिला. कोपर्डी हे फक्त निमित्त असून अॅट्रॉसिटीविरोधात काढले जाणारे मोर्चे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोपही त्यांनी गुरुवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. प्रा. कवाडे म्हणाले, कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाज उशिरा का होईना, रस्त्यांवर उतरून आंदोलने करीत आहे. लाखोंचे मोर्चे निघत आहेत, ही अभिनंदनाची बाब आहे; परंतु कोपर्डीचे निमित्त करून अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, त्यात सुधारणा करावी, अशी मागणी म्हणजे ह्यवड्याचं तेल वांग्यावरह्ण असला प्रकार सुरू आहे. असे मोर्चे यापूर्वीही विदर्भ, मराठवाड्यात निघाले आहेत. वरिष्ठ वर्गावर या कायद्यान्वये खोटे खटले दाखल केले जातात, या आरोपात फारसे तथ्य नाही. उलट अॅट्रॉसिटीचा गैरवापर राजकीय पक्ष व वरिष्ठ वर्गातील लोक आपल्या स्वार्थासाठी करतात. गेल्या दोन वर्षांत दलितांवरील अत्याचारांत ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बऱ्याच वेळा पोलिस यंत्रणाही दलितांच्या केसेस दाखल करून घेत नाही, याची अनेक उदाहरणे देता येतील. कायद्यात सुधारणा व कायदे रद्द करण्यापेक्षा समाजात योग्य ते प्रबोधन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. जे पक्ष, संघटना अॅट्रासिटी कायदा रद्द करावा वा त्यात सुधारणा करावी, अशी भूमिका घेतील त्यांच्यावर अनुसूचित जातिजमातींतील लोकांनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अॅट्रॉसिटीपेक्षा समाजमनात सुधारणा करा- जोगेंद्र कवाडे
By admin | Updated: September 8, 2016 17:23 IST