लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘ज्याचा माल त्याचाच हमाल’ याबाबत राज्यात निर्णय लागू झाल्यानंतर कोल्हापुरात अंमलबजावणी करा, विनाकारण शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनला दिल्या. याबाबत, आज शनिवारी निर्णय घेऊ, असे असाेसिएशनने सांगितले.
हमालीवरून निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी शुक्रवारी सकाळी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात बैठक झाली, मात्र ती निष्फळ ठरली. त्यानंतर सायंकाळी शासकीय विश्रामगृहात मंत्री मुश्रीफ यांनी संबंधित घटकांची बैठक घेतली. हमालीवरून गेली आठ दिवस कांदा-बटाटा व गूळ मार्केट ठप्प आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ज्याचा माल त्याचा हमाल’ याबाबत राज्यस्तरावर जो निर्णय होईल, तो कोल्हापुरात लागू केला जाईल. मात्र तोपर्यंत काम बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. यावर लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी आज, याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले. बैठकीला समितीच्या अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील, सचिव जयवंत पाटील, व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही.
भाडेपट्टीसोबत हमाली देतो मात्र ही रक्कम वाहन मालक, चालकाने माथाडी बोर्डाकडे जमा करावी, अशी भूमिका व्यापऱ्यांनी मांडली. यावर हमालीशी आमचा काहीही संबंध नाही. तरीही ती चालकाकडे देण्याची जबरदस्ती केल्यास व्यापाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला.
बाजार समितीत शेतकरी येत नाहीत. वाहनचालकच माल घेऊन येतो. त्यामुळे मालाचा मालक वाहनचालकच आहे. हमालीची जबाबदारी त्यांचीच आहे, असे समिती सचिव जयवंत पाटील यांनी सांगितले. कृष्णात चौगले, कुमार आहुजा, उदय देसाई, अनुप उब्रानी, हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, रामचंद्र गडदे, बाजीराव गडदे आदी उपस्थित होते.