कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत सोमवारपासून केंद्रावरच तत्काळ नोंदणी करुन लसीकरण करण्याची मोहीम सुरु करण्यात आली. या मोहिमेंतर्गत ३७९९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
सोमवारी हेल्थ केअर वर्कर व फ्रंटलाईन वर्कर ३४ तसेच १८ ते ४५ वर्षांपर्यंत २९६९ नागरिकांचे, ४५ ते ६० वर्षांपर्यंत ५६७ नागरिकांचे, साठ वर्षांवरील २२९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
सोमवारपासून शुक्रवारपर्यंत राबविण्यात येत असलेल्या १८ वर्षांवरील विशेष लसीकरण मोहिमेंतर्गत पहिल्याच दिवशी २०७२ नागरिकांना पहिला डोस तर ६६७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.
आज, मंगळवारी १८ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्डचा डोस देण्यात येणार आहे. यावेळी ५०० नागरिकांना कूपन देऊन ऑनस्पॉट रजिस्ट्रेशनद्वारे करुन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच भगवान महावीर दवाखाना व द्वारकानाथ कपूर दवाखाना येथे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणास प्रथम येणाऱ्या नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार असून ५०० पेक्षा अधिक नागरिक लसीकरणाकरिता उपस्थित राहिल्यास त्यांना कूपन देऊन दुसऱ्या दिवशी लसीकरणास बोलविण्यात येणार आहे. लसीकरणास येताना सोबत आधार कार्ड व फोटो आयडी असलेले कोणतेही ओळखपत्र घेऊन यावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.